औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी बुधवारी घेतला. हा सोहळा भव्य व देखणा व्हावा यासाठी नियोजन सुरू आहे.
ढोल पथक, तुतारी, फटाक्यांची आतिश बाजी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत यासह पोलीस बँड पथकाच्या हजेरीत हा सोहळा होणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांची यावेळी उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री शिंदे विद्यापीठात आल्यावर सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. हा सोहळा नाट्यगृहात थेट प्रेक्षपित होणार आहे. नाट्यगृहात पोवाड्यांचे सादरीकरण होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री नाट्यगृहात उपस्थितांना संबोधित करणार आहेत. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी सांगितले. यावेळी प्र कुलगुरु डॉ श्याम शिरसाट, संजय संभाळकर यांच्यासह पोलीस, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी करून घ्याठराविक पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन हा सोहळा न होता. सर्वपक्षीय पक्ष संघटनांना या सोहळ्यात सहभागी करून घ्या. अशी मागणी नागराज गायकवाड, अमोल दांडगे आदींसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.