औरंगाबाद - शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचं मिशन गुवाहटी यशस्वी झाले. या मिशनमध्ये त्यांना मराठवाड्यातील शिवसेना नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यातही, औरंगाबादचे आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी उघडपणे भूमिका घेत आपलं शिंदेप्रेम दाखवून दिलं. त्यामुळे, शिंदेंकडूनही मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं आहे. पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देण्यात आलं. तर, तानाजी सावंत हेही कॅबिनेटमंत्री झाले. त्यामुळे, मंत्री संदीपान भुमरे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवसांपासून आपणासोबत असलेल्या ५० आमदारांना निधी पडू देणार नसल्याचं आश्वासन दिलं. तसेच, हे सरकार सर्वसामान्य, गोरगरीब आणि शेतकऱ्यांचं असल्याचंही ते वारंवार सांगतात. त्यामुळे, बंडखोर आमदारांना निधीही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आमदार संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात तब्बल २०० कोटींचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसंदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी घवघवीत असा निधी दिला असून त्यांचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळेच, आम्ही मुख्यमंत्र्यांचा आमच्या मतदारसंघांमध्ये सत्कार करणार आहोत. या सत्कार समारंभप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. तसेच, मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री भागवत कराड, मंत्री अब्दुल सत्तार इतर मंत्र्यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे संदिपान भुमरे यांनी सांगितले.
शक्तीप्रदर्शनाची गरज नाही
मुख्यमंत्र्यांनी 200 कोटीचा निधी दिलेला आहे आणि त्याची मतदारसंघांमध्ये काम सुद्धा सुरू आहेत. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांची इच्छा होती की आपण त्यांचा सत्कार करावा याप्रसंगी माझ्याकडे स्नेह भोजनाचीसुद्धा व्यवस्था करण्यात आल्याचे भुमरे यांनी सांगितले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की आपण शक्ती प्रदर्शन तर करत नाही ना यावरती म्हणाले मला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही अगोदरच आमची शक्ती आहे.