औरंगाबाद : नागपूर ते मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे शनिवारी दुपारी घेतला. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गावर स्वतः गाडी चालवत कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कामाबाबत समाधान व्यक्त करत समृद्धी महामार्ग महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 बाबत सविस्तर सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदी माहितीचे सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनीही यावेळी प्रकल्पाची सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
यावेळी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, संजय सिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती होती.