औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी १०.३० वाजता झाले. पैठण रोडवरील कांचनवाडी परिसरात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी मुखमंत्र्यांनी मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्रात सर्वात आधी घोषणा झालेल्या औरंगाबाद येथील महाराष्ट्र विधी विद्यापीठाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. औरंगाबाद शहरात विधि विद्यापीठाची स्थापना करण्याची घोषणा नऊ वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ औरंगाबादसह राज्यातील तीन ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नागपूर आणि मुंबई येथे विधि विद्यापीठाला मान्यता मिळाली. औरंगाबादची घोषणा सर्वांत अगोदर झालेली असतानाही नागपूर, मुंबई येथील विद्यापीठे मागील शैक्षणिक सत्रापासून कार्यन्वित झाली.
मराठवाड्यावर अन्याय होत असल्याची टीका होत असतानाच औरंगाबादच्या विधि विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली वेगवान सुरू झाल्या. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी कुलगुरूपदी डॉ. एस. सूर्यप्रकाश यांची नेमणूक केली. यानंतर डॉ. सूर्यप्रकाश यांनी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारताच चालू शैक्षणिक वर्षापासूनच विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरूकरण्याचे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. राज्य सरकारच्या विविध विभागांचे सहकार्य घेत २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ कार्यान्वित केले. पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांचे प्रवेशही ‘क्लॅट’ या परीक्षेद्वारे करण्यात आले.