संभाजीनगर - महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी केली जात असल्याचा मला आनंद आहे. पण, "कावीळ झालेल्या लोकांना सगळंच पिवळं दिसतं" असं म्हणत एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावला आहे. तसेच त्यांना पिशाच्चाने पछडालं असल्याचंही शिंदेंनी म्हटलं होतं. आता, शिंदेंच्या या टीकेवर शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, भाजपची तळी उचलण्याचं काम एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे. मुख्यमंत्री केंद्र सरकारची, भाजपची तळी का उचलतात. आम्हाला पिशाच्च झाले म्हणण्यापेक्षा तुम्हालाच बाहेर वाद झालेला आहे. खेड्यापाड्यामध्ये म्हणतात की याला बाहेर वाद झालेला आहे. म्हणजे, कोणाचं एवढं ऐकायचं, एवढं ऐकायचं, की एखाद्याला काही सांगितले तरी ते ऐकायचं. समजा, एखाद्याने सांगितले विहिरीत उडी मार तरी तुम्ही विहिरीत उडी मारून टाकणार अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारचा बाहेर वाद एकनाथ शिंदेंना झालेला आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केलीय.
दरम्यान, राष्ट्रपतींना देशातील सर्व आमदारांनी खासदारांनी निवडून दिलेले आहे. त्यांच्या शुभहस्ते संसदेचे उद्घाटन करावे म्हणजे हे पिशाचं मानणे आहे का? लोकशाहीने राष्ट्रपतींना उद्घाटनाला आणा म्हणणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे का, त्यांच्याच भाषेत सांगायचे म्हटले तर खरे पिशाच्च आम्हाला नाही. तर, त्यांनाच बाहेर वाद झाला असल्याचे दानवे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी प्रकल्प मार्गी लावले
मुख्यमंत्री ज्या खात्याचे मंत्री होते महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री महत्त्वाचे मंत्री होते. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालेला महामार्ग महाविकास आघाडीच्या काळात कुठे थांबला, स्वतः उद्धव ठाकरे आताचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांना सोबत घेऊन दौरा केला, पाहणी केली कोणताही निधी कमी पडणार नाही याची खबरदारी घेतली. अनेक गोष्टी अशा आहेत की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने काम केले या महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गतीने मार्गी लावलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील जे सरकार होते त्या काळातील अनेक प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
आता, गावपातळीवर कामांना स्थगिती
आता जे सरकार आलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गाव पातळीवरील कामांची स्थगिती दिसत आहे. अजून सुद्धा स्थगिती उठवण्याच्या शेकडो फाईल पडलेल्या आहेत . विरोधी पक्षातील एखाद्या आमदाराला तो व्यक्ती भेटला तर त्याच्या फाईलवर अर्जावर सही होत नाही पत्रावर सही होत नाही. राजकीय विरोधक असलेल्या माणसाच्या पत्रावर सही होत नाही आमदारांचा राग लोकांवर का काढता आणि सर्वात मोठी जी स्थगिती दिली आहे. म्हणजे या आताच्या सरकारने दिलेली ती स्थगिती उठण्याची आवश्यकता आहे, असेही दानवे यांनी म्हटलंय.