छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण याबाबतचे सस्पेन्स मुख्यमंत्र्यांनी मंगळवारीही कायम ठेवला आहे. यामुळे शिंदेसेनेच्या इच्छुक उमेदवारांपैकी ज्याच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचे हात पडेल त्याच इच्छुकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असल्याचे स्पष्ट आहे. शिंदेसेनेचे प्रवक्ता आ.संजय शिरसाट यांनी नेहमीप्रमाणे आज पुन्हा दोन दिवसांत उमेदवाराच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करतील, असा दावा केला.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे. महाविकास आघाडीने उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली. एमआयएम आणि वंचीत बहुजन आघाडीनेही स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरविले आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे)यांच्यात सुरवातीला औरंगाबादच्या जागेबाबत रस्सीखेच सुरू होती. नंतर मात्र औरंगाबादची जागा शिंदेसेनेला देण्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपचे स्थानक इच्छुक बॅकफुटवर गेले. दुसरीकडे शिंदेसेनाच येथील जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून इच्छुक उमेदवार जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.
दोन दिवसापूर्वी चिकलठाणा विमानतळावर मुख्यमंत्री आले असता विनोद पाटील आणि राजेंद्र जंजाळ यांनी त्यांची भेट घेतली होती. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी , एमआयएम व वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली. तेव्हा महायुतीचा उमेदवार कोण येतो, याकडे इच्छुकांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांचेही लक्ष लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मागील महिनाभरात अनेकदा दोन दिवसांत उमेदवारी जाहिर होईल असे सांगितले आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री औरंगाबादच्या उमेदवाराची घोषणा करतील असे सांगितले हाेते. मात्र आजही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दोन दिवसांत मुख्यमंत्री उमेदवारी घोषित करतील असे पत्रकारांना सांगितले. यामुळे औरंगाबादचा उमेदवार कोण याचा सस्पेन्स मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवल्याचे दिसून येते. दुसरीकडे महायुतीकडून उमेदवार देण्यास विलंब होत असल्याने विरोधीपक्षाकडून सतत टीका केली जात आहे.