औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काढलेली महाजनादेश यात्रा औरंगाबादेत मंगळवारी (दि.२७) दाखल होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर विविध ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून, सायंकाळी ७ वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात्रेच्या स्वागतासाठीची तयारी औरंगाबाद भाजपने पूर्ण केली असल्याचे राज्यमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
महाजनादेश यात्रेच्या तयारीची माहिती देण्यासाठी सभास्थानी भाजपतर्फे सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराध्यक्ष तनवाणी म्हणाले, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गेवराई, अंबड येथून औरंगाबादकडे येणार आहे. औरंगाबाद शहरात चिकलठाणा येथे यात्रेचे स्वागत केले जाईल. तेथून सभास्थळापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. यादरम्यान जालना रोडवर ठिकठिकाणी महाजनादेश यात्रेचे स्वागत केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यमंत्री अतुल सावे म्हणाले, महाजनादेश यात्रेचे शहरात स्वागत करण्यासाठी मागील पाच दिवसांपासून तयारी करण्यात येत आहे. नऊ मंडळांतील बुथ प्रमुखांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक बुथ प्रमुखांवर २५ युवकांना घेऊन येण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय नगरसेवक, पदाधिकारी यांनीही बैठका घेऊन यात्रेविषयी जनजागृती केली आहे.
जालना रोडवर मुकुंदवाडी, एपीआय कॉर्नर, सेव्हन हिल, गुलमंडी, क्रांतीचौक, गुलमंडी, महात्मा फुले याठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचेही सावे यांनी सांगितले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या यात्रेने औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आडूळ, भालगाव फाटा आणि आडगाव येथे स्वागत केले जाणार असून, चितेगावला स्वागत सभा होईल. यानंतर ही यात्रा चिकलठाणा येथून शहरात प्रवेश करील. बुधवारी सकाळी ही यात्रा फुलंब्री, सिल्लोड, भोकरदनमार्गे जालना शहरात पोहोचणार असल्याचेही डॉ. कराड म्हणाले. जालना येथील सायंकाळच्या सभेला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, म्हाडाचे सभापती संजय केणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहरभर वातावरणनिर्मितीमहाजनादेश यात्रेची वातावरणनिर्मिती करण्यासाठी भाजपतर्फे शहरभर बॅनरबाजी करण्यात आली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहनही यातून करण्यात आले. भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर लावण्याची चढाओढ असल्याचे चित्र आहे.