औरंगाबाद : दरवर्षी १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शहरात येतात ध्वजारोहण करून, भाषण देऊन निघून जातात. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. मराठवाड्याला आजपर्यंत राज्यकर्त्यांनी काय दिले, तर काहीच नाही. मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत आज एमआयएम पक्षाकडून करण्यात आले. चिकलठाणा विमानतळापासून सिद्धार्थ उद्यानापर्यंत कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी विकासकामांचे फलक दाखवून पुष्पवृष्टी केली.
मराठवाड्याचा आजपर्यंत सर्वांगीण विकास झाला नाही. विकासाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढतोय. विकासासाठी मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्यापेक्षा त्यांचे उपहासात्मक स्वागत करण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी खा. इम्तियाज जलील यांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी विमानतळ, अदालत रोड, महावीर चौक, सिद्धार्थ उद्यान येथे एमआयएम कार्यकर्ते विकासकामांचे फलक घेऊन उभे होते. मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. कार्यकर्त्यांना अटक करून सिडको पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नंतर त्यांना सोडून दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष समीर अब्दुल साजेद, शहराध्यक्ष शहारेख नक्षबंदी, माजी जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, माजी नगरसेवक जमीर कादरी, नासेर सिद्दीकी, गंगाधर ढगे, शेख अजीम, फेरोज खान यांच्यासह रफत यारखान, रफीक चिता, आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रसार माध्यमांसोबत बोलताना खा. इम्तिया जलील यांनी सांगितले की, मराठवाड्यातून दरवर्षी ६ हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जातात. त्या तुलनेत मराठवाड्यातील विकासकामांसाठी फक्त ६३३ कोटी रुपये उपलब्ध होत आहेत. औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेण्यात आले. रस्त्यांवर आजही खड्डेच खड्डे आहेत. नळांना स्वच्छ पाणी येत नाही. अनुशेष भरून काढण्याबाबत सरकार काहीच बोलत नाही, म्हणून हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद येथील कार्यक्रमात क्रीडा विद्यापीठाच्या मुद्यावर मुंबईला या. तेथे हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिल्याचे जलील यांनी सांगितले.