लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्टसिटीसह विविध शासकीय योजनांचा आज विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आढावा घेतला व कामांना गती देण्याचे आदेश दिले.मराठवाड्यात सुरू असलेल्या स्वच्छ महाराष्टÑ अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रगती शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रम, गुणवत्ता विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार, स्मार्टसिटी प्रकल्प, मागेल त्याला शेततळे आदी योजनांबाबत माहितीचे सादरीकरण विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी स्वत: केले. तसेच मराठवाड्यातील पर्जन्यमान, पाणीसाठा, पीक परिस्थिती, पीक कर्ज, पीकविमा योजना, चला गावाकडे जाऊ याबाबत माहितीही मुख्य सचिवांना देण्यात आली.विविध शासकीय योजनांचा आढावा घेताना सुमित मल्लिक म्हणाले, मराठवाड्यातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची गरज आहे. स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत समाजात जनजागृती केली पाहिजे. मराठवाड्यात सुरू असलेल्या विविध योजना व विकासकामांबाबत मुख्य सचिवांनी समाधान व्यक्त केल्याचे समजते. या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, एमएसईडीसीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मनपाचे आयुक्त डी. एम. मुगळीकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, डॉ. विजयकुमार फड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकुंद सुरकुटवार, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अनिल रामोड, महसूल उपायुक्त प्रल्हाद कचरे, सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा ठाकूर, पुनर्वसन उपायुक्त महेंद्र हरपाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, रोहयो उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
स्मार्टसिटीच्या कामांना गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:15 AM