औरंगाबाद: पोलीस असल्याची बतावणी करून वावरणाऱ्या तोतयाला चिकलठाणा पोलिसांनी शनिवारी शेंद्रा कमंगर येथे पकडले . आरोपीकडून पोलीस लाठी, सिटी आणि मोटर सायकल जप्त करण्यात आली.
योगेश तुकाराम साठे (रा . टोणगाव )असे अटकेतील तोतया पोलिसाचे नाव आहे . याविषयी चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, आरोपी योगेश हा मोटरसायकलवर पोलीस अक्षर लिहून आणि लाठी बांधून शेंद्रा कमंगर येथे वावरत होता. यावेळी तेथील लोकांना तो पोलीस असल्याचे सांगत . शनिवारी तो पुन्हा शेंद्रा कमंगर येथे दुचाकीवर आला .यावेळी त्याच्या अंगावर पोलीस कमांडो घालतात तशी पॅन्ट , बूट आणि दुचाकीच्या चावी च्या साखळीला पोलीस अक्षर असलेली पितळी सिटी , मोटारसायकलला पोलिसांचा दंडा बांधलेला होता. गस्तीवरील पोलीस हवालदार रवींद्र साळवे यांनी अन्य पोलिसांनी त्याला अडवले आणि चौकशी केली त्यावेळी .त्याने तो मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे म्हणाला. पोलिसांना त्याच्या वागण्यावर संशय आल्याने त्याला चिकलठाणा ठाण्यात नेण्यात आले.
तेथे सहाय्यक निरीक्षक महेश आंधळे यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा त्याची बोबडी वळली. तेव्हा त्याने तो विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ ) असल्याचे सांगितले . चार वर्षापूर्वी तो मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात स्वछेने एसपीओ म्हणून काम करीत होता. त्यावेळी त्याच्यासह अन्य नागरिकांना पोलीस प्रशासनाने प्लास्टिक शिटी दिली होती. पोलिसासोबत राहून योगेशने पोलीस कॉन्स्टेबल असल्यासारखे वावरण्यास सुरुवात केली. तो पोलीस कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलीस हवालदार साळवे यांनी सरकारतर्फे योगेशविरुद्ध चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.