वासडी ( छत्रपती संभाजीनगर) : परिसरातील अनेक गावांमध्ये चिकूच्या फळबागा आहेत. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने या बागा धोक्यात आल्या आहेत. बागांना बहार लागण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक पाण्याची आवश्यकता लागते. मात्र यंदा वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याने चिकूच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे फळबागधारक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कन्नड तालुक्यातील वासडी परिसरातील साखरवेल, खातखेडा, रामनगर, पळशी बु., पळशी खु, पिशोर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिकूच्या बागा आहेत. यातील अनेक फळबागा या तीस वर्षांपूर्वीच्या आहेत. या फळबागांना एप्रिल मे मध्ये पाण्याची व्यवस्था असली, तर उत्पादनात चांगली वाढ होते. मात्र यंदा परिसरातील अंजना-पळशी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे. तसेच कडक उन्हाळ्यामुळे विहिरींमधीलही पाणी आटले आहे. परिणामी शेतकऱ्यांना ऐन बहरात या फळबागांना पाणी देता आले नाही, याचा विपरीत परिणाम मृग बहार धरण्यावर, तो टिकण्यावर आणि पर्यायाने उत्पादनात सर्वाधिक फटका बसणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या आंबा बहरावरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता जूनमध्ये जरी पाणीटंचाई दूर झाली तरी, बागांचे नुकसान भरून निघणार नाही, अशी माहिती खातखेडा येथील शेतकरी नारायण मोहनराव पवार, रामनगर येथील शेतकरी संजय कौतिकराव गायकवाड यांनी दिली.
पाणीटंचाईमुळे ठिबकचा वापरवासडी परिसरातील जवळपास शेतकरी चिकूच्या बागांना यापूर्वी आळे पद्धतीने पाणी देत होते. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी उधार उसणे करीत ठिबक संच घेतलेला आहे. ठिबकमुळे कमी पाणी लागत असले तरी, पाणीटंचाई असल्याने बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
नवीन कळ्या लागू शकल्या नाहीया उन्हाळ्यात नेहमीपेक्षा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चिकूच्या झाडांना नवीन कळ्या लागू शकल्या नाहीत तर ज्या लागल्या होत्या, त्यापण गळून गेल्या. उष्णता व पाणीटंचाईमुळे फळे झाडावरच पिकली. पैकी काहीची गळ झाली. त्यामुळे सगळी फळे विक्रीसाठी उपलब्ध झाली नाहीत. परिणामी मोठे नुकसान झाले.- सोपान विठ्ठलराव लोंढे, शेतकरी, रामनगर