औरंगाबाद : मोबाइलमध्ये ऑनलाइन गेम खेळण्यासाठी परस्पर आईच्या बँक खात्यातून आठ हजार खर्च केले. हे कळल्यावर आई रागावली. त्यामुळे घर सोडून गेलेल्या १६ वर्षीय मुलाला पुंडलिकनगर पोलिसांनी शोधून आणत पालकांच्या स्वाधीन केले. मोबाइलमुळे मुले काय करताहेत याकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके यांनी सांगितले की, पुंडलिकनगर परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याचा १६ वर्षीय मुलगा इयत्ता दहावीत शिकतो. तो चार महिन्यांपासून आईच्या मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळत होता. आईचे पेटीएमचे, ऑनलाइन बँकिंगचे पासवर्ड त्याला माहीत असल्याने परस्पर खात्यातून १०० ते ३०० रुपये भरून तो गेम खेळत होता. आईने काही दिवसांपूर्वी पासबुक अपडेट केले. त्यावेळी खर्च केलेल्या पैशाचा जाब मुलाला विचारला. तेव्हा मुलाने ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे खर्च केल्याचे सांगितले. आई त्याच्यावर रागावल्याने १५ जून रोजी रात्री तो घर सोडून निघून गेला. १६ जूनला आई-वडिलांनी पुंडलिकनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलीस पथकाने दोन दिवस शोध घेतला. दरम्यान, १७ जूनला दुपारी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाइलवरून मुलाने आईला फोन करून हॅलो म्हणून फोन कट केला. त्या फोनबद्दल आईने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या मोबाइलच्या ठिकाणाचा शोध लावत साजापूर फाटा गाठले. पोलिसांसोबत आई-वडिलांना पाहून मुलगा लपून बसला. पुन्हा काही वेळाने मुलगा भेटला. विश्वासात घेतल्यानंतर त्याने आई रागावल्याने घर सोडल्याचे सांगत पैसे मोबाइल गेमवर खर्च केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन करत मुलाकडे लक्ष देण्याचे सांगितले.
मुलांवर लक्ष द्यापालकांनी आपली मुले मोबाइलवर किती वेळ घालवतात. ते काय करतात. कोणता गेम व किती वेळ गेम खेळतात. यावर लक्ष ठेवून वेळीच काळजी घ्यावी, असे आवाहन पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले आहे.