औरंगाबाद : घाटी रुग्णालयात स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयने ( डीएमईआर) गंभीर दखल घेतली असून या घटनेचा संपूर्ण अहवाल मागविला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेला जबाबदार धरून रुग्णालय आणि प्रशासनातील दोषींची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
छावणी परिसरातील एका महिलेला सोमवारी रात्री प्रसूतिकळा सुरू झाल्या. तेव्हा कुटुंबियांनी महिलेला प्रारंभी छावणी रुग्णालयात नेले. याठिकाणी महिलेला प्रसूतिकळा नसल्याचे सांगून दोन गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतर सदर महिलेला कुटुंबियांनी रात्री १ वाजेच्या सुमारास घाटीत आणले. वाहनातून उतरून ते अपघात विभागात पोहोचले.
अपघात विभागातून काही पायऱ्या चढून समोरील व्हरांड्यातील लिफ्टपर्यंत पोहोचत नाही तोच महिलेची अचानक प्रसूती झाली आणि नवजात बाळ थेट फरशीवर पडले. एका परिचारिकेने बाळ वेगळे करीत त्यास प्रसूती कक्षात हलवले; परंतु तोपर्यंत ते दगावले होते. स्ट्रेचरवरून वॉर्डात नेताना जर प्रसूती झाली असती, तर बाळ खाली पडले नसते. त्यामुळे स्ट्रेचरचा वापर केला असता तर ते सुखरूप राहिले असते, असे घाटीतील काही डॉक्टरांनी सांगितले.ही संपूर्ण घटना 'लोकमत'ने सविस्तर समोर आणल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात घटनेच्या दिवशी कर्तव्यावर हजर असलेल्या डॉक्टरांपासून तर चतुर्थश्रेणी अशा दहा जणांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहे. तीन दिवसांत त्यांच्याकडून उत्तरे येणार आहे. त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे. रुग्णालयस्तरावर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्याबरोबरच घटनेची 'डीएमईआर'नेही गंभीर दखल घेतली आहे
याविषयी सविस्तर माहिती मागविण्यात आली. त्यानुसार घाटी प्रशासनाने घटनेसंदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांबरोबर प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याची चिन्हे आहेत.
१२८ वेळा स्ट्रेचर दुरुस्तीगेल्या काही महिन्यांत घाटीत १२८ वेळा स्ट्रेचरची दुरुस्ती करण्यात आली. घाटीला अनेकांनी स्ट्रेचर दान केली. या घटनेनंतरही स्ट्रेचर देण्यात येत आहे. परंतु दुरुस्तीवर अधिक खर्च टाळण्यासाठी दजेर्दार स्ट्रेचर घेण्याचा निर्णय घाटीने घेतला आहे. शिवाय आता मेडिसिन विभागासह विविध ठिकाणच्या लिफ्ट युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात आल्या आहेत.घटनाक्रम सादरडीएमईआर'ला घडलेल्या घटनेचा अहवाल सादर केला आहे. कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची लवकरच उत्तरे प्राप्त होतील.-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(घाटी)