सिल्लोड (औरंगाबाद) : औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटीत एका विवाहितेची प्रसूती झाली. यावेळी डॉक्टरांना माता अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. या माहितीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तिच्या पती विरुद्ध बलात्काराचा तर सासू-सासरे, आई आणि लग्नाचे विधी पार पाडणाऱ्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील जांभई येथील एका अल्पवयीन मुलीचे ३ मार्च २०२१ रोजी आईने फुलंब्री येथील मुलाशी लग्न लावून दिले. अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही पतीने अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. विवाहिता प्रसूती औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल झाली. येथे विवाहितेने मुलीला जन्म दिला पण प्रसूती दरम्यान डॉक्टरांच्या ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
यावरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी स्वतः तक्रार देऊन पती, सासू-सासरा, मुलीची आई आणि लग्न विधी पार पाडणाऱ्या विरुद्ध कलम ४,६,८,१२ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, सह कलम ९ व १० बालविवाह प्रतिबंध अधिनियम नुसार शुक्रवारी गुन्हा दाखल केला. तर पती विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.