औरंगाबाद : मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचे स्वरूप कसे आहे, याचा मागोवा घेण्यासाठी युनिसेफची महाराष्ट्र शाखा, नाईन इज माईन आणि मुंबई स्माईल यांनी संयुक्तपणे राज्यव्यापी सर्वेक्षण (संशोधन अभ्यास) केले. यात ८ जिल्ह्यांंतील १३ ते १७ वयोगटातील ५ हजार मुला-मुलींनी सहभाग घेतला. त्यातून घरातही मुलांवर विविध प्रकारे अत्याचार होत असल्याचे पुढे आल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
युनिसेफच्या प्रकल्पप्रमुख अलका गाडगीळ, मास्टर ट्रेनर पांडुरंग सुदामे, सुजाता शिरके, रुचा सतूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. घराबाहेर होणारी लैंगिक हिंसा, अत्याचार, मारहाण, खून यावरच अधिक लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, घरामध्येही मुलांवर हिंस्त्र हल्ले सुरू आहेत. शाळांमध्ये विविध प्रकारे अत्याचार होतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. मुलांची शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा याबरोबर आर्थिक हिंसा, दुर्लक्षपणातूनही हिंसा केली जात आहे. घरामध्ये हातात जे काही असेल ते फेकून मारणे, लाथा-बुक्क्यांनी तुडवणे, गरम पळीचा डाग देणे, असे प्रकार होतात. घरासह शाळा, शाळेबाहेरील संस्थेतही अनेक प्रकार होतात. याविषयी आवाज उठविण्याची आणि जनजागृतीची गरज असल्याचे गाडगीळ म्हणाल्या. सुजाता शिरके म्हणाल्या, घरांमध्ये सतत भांडण होत असलेली मुलेही हिंसेकडे वळतात. काही मुलांच्या समुपदेशनातून या बाबी समोर आल्याचे त्या म्हणाल्या.
प्रत्येक बाळाचे ४ हक्कपांडुरंग सुदामे म्हणाले, गर्भधारणेपासून तर प्रसूतीनंतरची दोन वर्षे म्हणजे १ हजार दिवस बाळासाठी महत्त्वाची आहेत. या कालावधीत बाळाच्या मेंदूची सर्वाधिक वाढ होत असते. प्रत्येक बाळाचे हे ४ हक्क आहेत : १) जन्मल्यानंतर पहिल्या ५ मिनिटांत बाळाचा आईच्या गालाशी स्पर्श झाला पाहिजे आणि तासाभरात आईचे दूध पाजले पाहिजे. २) पहिली ६ महिने आईचे दूध पाजले पाहिजे. ३) पहिल्या ६ महिन्यांनंतर घरगुती पोषक आहार आणि दोन वर्षांपर्यंत आईचे दूध पाजणे. ४) बाळाला खाऊ घालताना त्याच्याशी संवाद साधवा.
घरातील अत्याचाराचे स्वरूप- २५ टक्के मुलांना आईकडून मारहाण.- २१ टक्के मुलांना वडिलांकडून मारहाण.- ११.६ टक्के मुले घरी नाखुश.- ६.७३ टक्के मुलांना घरी असुरक्षित वाटते.- २५ टक्के मुलांसोबत थोबाडीत मारण्याचा प्रकार.- १७ टक्के मुलांना मारहाण.- ६ टक्के मुलांना लाथ मारण्याचा प्रकार.- २ टक्के मुलांना चटके देण्याचा प्रकार- ११.१६ टक्के मुलांची आरोग्य काळजी घेतली जात नाही.