वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतीत मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदाने कचरा व टाकाऊ साहित्य पडल्याने गलिच्छ झाली आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. देवगिरीनगरातील मैदानाची शाळकरी मुलांनी गुरुवारी साफसफाई करुन मैदान स्वच्छ केले.
सिडको प्रशासनाने नागरी वसाहत भागात मुलांना खेळण्यासाठी तसेच सार्वजनिक उपक्रमासाठी मैदाने राखीव ठेवली आहेत. परंतू प्रशासनाकडून या मैदानाच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. लगतचे रहिवाशी मोकळ्या मैदानातच ओला व सुका कचरा, खरकटे तसेच टाकावू साहित्य टाकत आहेत. शिवाय मोकाट जनावराचाही सतत वावर असतो. त्यामुळे देवगिरीनगर व साईनगरातील मैदानाची दुरावस्था झाली. मैदानात कचरा व दगड गोठे साचल्याने मुलांना खेळता येत नाही.
कचऱ्यामुळे दुर्गंधीही पसरली आहे. पर्यायी जागा नसल्याने लहान मुलांना रस्त्यावर किंवा दुर्गंधीचा त्रास सहन करत मैदानात खेळावे लागत आहे. खेळताना दगडामुळे पडून जखमी होत आहेत. येथील नागरिकांकडून मैदान स्वच्छ व देखभालीची मागणी केली जाते. पण प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक केली जाते. अखेर गुरुवारी दुपारी या भागातील शाळकरी मुलांनी एकत्र येवून देवगिरीनगरातील मैदानाची साफसफाई करुन संपूर्ण मैदान स्वच्छ केले. मैदानात साचलेला कचरा व दगड उचलून एका बाजूला ठेवत लहान मुलांनी सिडको प्रशासनासह येथील नागरिकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.