छत्रपती संभाजीनगर : पूर्वी मुलाला चष्मा असेल तर तो फार अभ्यास करतो, असे म्हटले जात असे. मात्र, अलीकडे मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी एक वर्षाच्या मुलालाही चष्मा दिसतो. शिक्षणासह मनोरंजनासाठी मुलांमध्ये मोबाइल, लॅपटाॅपचा वापर वाढला आहे. त्यामुळे अति अभ्यासामुळे मुलांना चष्मा लागतो आहे की, मोबाइलमुळे असा प्रश्न पालकांना सतावतो.
मुलांना चष्मा लागण्याची कारणे काय?अनुवंशिक : अनुवंशिक कारणामुळे म्हणजे आई-वडिलांना चष्मा असेल तर मुलांमध्येही चष्मा लागण्याची शक्यता वाढते.आहार : सकस आहाराच्या अभावामुळेही दृष्टिदोष निर्माण होतो.
मोबाइल : एक वर्षाचे मूलही आता अगदी कुशलतेने मोबाइल हाताळत असल्याचे पाहायला मिळते. मोबाइलच्या वाढत्या वापराने मुलांमध्ये दृष्टिदोष निर्माण होण्यास हातभार लागत आहे.टीव्ही : टीव्ही पाहण्याचे प्रमाण मुलांमध्ये अधिक आहे. त्यामुळे टीव्हीदेखील चष्मा लागण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
काय काळजी घ्याल?मोबाइल, टीव्हीपेक्षा मुले घराबाहेर खेळतील, छंद जोपासतील, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. मुलांना सकस आहार द्यावा. आई-वडिलांना मायनस नंबरचा चष्मा असेल तर मुलांच्या डोळ्यांचीही नियमितपणे तपासणी करावी.
आऊट डोअर ॲक्टिव्हिटी महत्त्वाचीमुलांचे मैदानी खेळ, व्यक्तिमत्त्व विकासाचे इतर छंद (आऊट डोअर ॲक्टिव्हिटीज) बंद झाले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहणेही कमी झाले आहे. टीव्ही, मोबाइल, लॅपटाॅपचा वापर वाढला आहे. याचा परिणाम दृष्टीवर होतोय. पालकांनी मुलांच्या दृष्टिदोषाकडे वेळीच लक्ष द्यावे. शाळेतही नियमितपणे नेत्र तपासणी झाली पाहिजे. मायनस नंबर असणाऱ्यांसाठी मल्टिफोकल चष्मे आले आहेत. त्यामुळे दृष्टिदोष वाढत नाही. मुलांना शाळेत टाकतानाच नेत्र तपासणी महत्त्वाची ठरू शकते.- डाॅ. मनोज सासवडे, नेत्रतज्ज्ञ