छत्रपती संभाजीनगर : चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी शहरातील एका वसाहतीचे स्थलांतर करावे लागले. तत्कालीन आयुक्तांनी सिडको-हडकोतील जागा देऊन सिद्धार्थनगर नावाने नवी वसाहत उभी केली. नामांतर चळवळीतील पीडित कुटुंबीयांना येथे जागा देण्यात आली. त्यास ‘नामांतर कॉलनी’ असे नाव देण्यात आले. आता येथील मजुरांची, चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मुले शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलिस, उद्योजक बनत असल्याचा अभिमान येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
अगदी लहान घरांत आपण गरिबीत असलो, तरी मुलांना शिक्षण, संस्कार देऊन मोठे करण्याचा संकल्प रहिवाशांनी तडीस नेऊन दाखवला. बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होत आहेत. विहारात धार्मिक व संस्कार शिबिरांतून युवक-युवतींसाठी संस्कारक्षम वातावरण बनले आहे. आयटी व काॅर्पोरेट, बँकिंग सेक्टरकडे येथील युवक वळलेले आहेत. बांधकाम मजूर आता मोठे ठेकेदार बनले आहेत.
शिक्षणामुळे युवकांची पावले प्रगतीच्या दिशेने...सिद्धार्थनगराची जडणघडण होताना अनेक अडचणींतून मार्ग काढताना कष्ट सहन करावे लागले. जीवनात परिश्रमाशिवाय काही नाही; परंतु विविध लोकप्रतिनिधींनी सढळ हाताने केलेल्या मदतीने सिद्धार्थनगराचा विकास साध्य करता आला. रस्त्यापासून ते सांडपाणी इतर सर्वच व्यवस्थापन झालेले नव्हते. आता सर्वच व्यवस्थित झालेले असून, शिक्षणामुळे युवकांची पावले प्रगतीच्या दिशेने आहेत.-दौलत खरात (सामाजिक कार्यकर्ते)
मनपाकडून प्रयत्न केले...शहरातील ही पहिली सिडकोच्या बाजूला प्रशासनाने वसवलेली वसाहत आहे. कालांतराने परिसराचा विकास होत गेला अन् आता दुर्लक्षित असलेल्या परिसरात लोकप्रतिनिधी, तसेच मनपाच्या माध्यमातून योजना आणून सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. सर्वच स्थानिक नगरसेवकांचाही खारीचा वाटा नामांतर कॉलनी व सिद्धार्थनगरसाठी महत्त्वाचाच ठरलेला आहे.- कुसुम खरात (माजी नगरसेविका)
शिक्षणावर जोर दिला...कष्टकऱ्यांची मुलं, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे मुलांच्या मनात बिंबविल्याने येथील काहीअंशी युवक शिक्षण तंत्रज्ञानाच्या मदतीने बँक, तसेच काॅर्पोरेक्ट सेक्टरपर्यंत नोकरीसाठी पोहोचत आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या दिशेनेही युवकांची वाटचाल आहे.- पंडित बोर्डे (समाजसेवक)
उद्योजकता प्रशिक्षण सुरू करावेसुशिक्षित युवकांना रोजगार उभा करण्यासाठी येथे शासनातर्फे रोजगारासाठी प्रशिक्षण उपक्रम राबवून त्यांना बँकेच्या सहकार्याने उद्योग निर्मितीसाठी सहकार्याची अपेक्षा आहे. बँकांकडून कर्ज देण्यासाठी लादण्यात येणाऱ्या अटी कमी करण्याची गरज आहे. जेणेकरून झोपडपट्टीतील युवकही उद्योजक बनतील. - शरद काकडे (रहिवासी)
सफाई होते, डीपीवर झाडंझुडपं तोडणार कोण...सिद्धार्थ नगर परिसरात सफाई होते. परंतु, झाडाझुडपांनी डीपीला वेढा घातला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातून अनेकदा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणी येतात. त्याकडे महावितरण किंवा मनपाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न आहे.- बुद्धिराज सोनवणे (रहिवासी)
पाणीपुरवठ्याकडे लक्ष द्या...पाणीपुरवठ्यावर मनपाने लक्ष देण्याची गरज आहे. आठ आठ दिवसाने पाणीपुरवठा तोही अपुऱ्या स्वरूपात होतो. त्यातून बहुतांश गल्लीत दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वाढलेली आहे. नागरिकांना अनेकदा जारच्या पाण्यावरही तहान भागविण्याची वेळ येते. - महेंद्र बोर्डे (रहिवासी)