संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाचा तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याची भीती व्यक्त होत आहे. पण या तिसऱ्या लाटेआधीच कोरोनातू बरे झालेल्या लहान मुलांना ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ची (एमएसआयसी) बाधा होत आहे. यातून कोरोनापाठोपाठ बालकांना विविध आजार उद्भवत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठांना बाधा होण्याचे प्रमाण अधिक राहिले. मात्र, दुसऱ्या लाटेत लहान मुलांपासून तर तरुणांनाही कोरोनाने विळख्यात घेतले. लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत अशा सर्वांना रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रत्येक वयोगटातील रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावण्याची वेळ ओढावल्याचे या दुसऱ्या लाटेत पहायला मिळाले. कोरोनाला सामोरे जाणाऱ्या बालकांनी उपचार घेऊन कोरोना हरविले, मात्र, बरे झाल्यानंतरही पोस्ट कोविडमध्ये अनेक आजारांना सामोरे जाण्याची वेळ अनेक बालकांवर ओढावत आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर मुलांना ‘एमएसआयसी’चा धोका पहायला मिळत आहे. शहरातील अनेक रुग्णालयांत अशा बालकांवर उपचार सुरू आहेत. पण कोरोनातून बरे झालेल्या एक ते दोन टक्के बालकांनाच हा धोका आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
---
जिल्ह्यात नऊ हजारांवर
मुलांना झाला कोरोना
औरंगाबादेत शून्य ते पाच वर्षे या वयोगटात एक हजार ३९४ मुलांना कोरोनाची बाधा झाली, तर ५ वर्षे ते १८ वर्षे या वयोगटातील ७ हजार ८१८ जणांना कोरोना झाला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले.
---
ही घ्या काळजी
१) कोरोना होणारच नाही, यादृष्टीने पालकांनी स्वत:बरोबर लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाणे टाळले पाहिजे. शक्य झाले तर पालकांनी विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
२) मुलांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्यासंदर्भात वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्यावर भर द्यावा. वेळीच उपचाराने आजार लवकर बरा होण्यास मदत होते.
३) मुलांना जंक फूडऐवजी सकस आहार दिला पाहिजे. शक्य असेल तर मुलेही व्यायाम करतील, यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
-
वेळीच लक्ष द्यावे
कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन आठवडे ते तीन महिन्यांपर्यंत ‘एमएसआयसी’ होण्याचा धोका असतो. पोस्ट कोविडमध्ये प्रतिकारशक्ती नेहमीपेक्षा वेगळा प्रतिसाद देते, तेव्हा हे होते. पालकांनी मुलांमधील लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.
- डाॅ. संध्या कोंडपल्ले, सचिव, बालरोगतज्ज्ञ संघटना, औरंगाबाद
------
एमएसआयसी
अशी आहेत लक्षणे
-मुलांना खूप ताप येणे, पाच दिवसांपर्यंत कमी न होणे.
-मुलांचे डोळे लाल होणे.
-त्वचेवर रॅसेस पडणे.
-मळमळ, उलट्या होणे.
-मुलांच्या सतत पाेटात दुखणे.