तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील बसस्थानक परिसरात सध्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून, या कामावर मजुरांसोबतच त्यांची लहान मुले देखील पोटाची खळगी भरण्यासाठी हातात खोऱ्या-टोपले घेऊन राबत असल्याचे चित्र आहे. येथे २००१ साली तीन बसथांब्याचे बसस्थानक बांधण्यात आले. परंतु, बसस्थानकासमोरील परिसरात केवळ खडीकरण करण्यात आले होते. तब्बल सोळा वर्षानंतर रा. प. महामंडळाकडून डांबरीकरणाच्या कामासाठी तीस लाखांचा निधी मंजूर झाला असून, दोन-तीन दिवसांपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. या कामावर सध्या परभणी जिल्ह्यातील काही मजूर काम करीत आहेत. परंतु, या मजुरांसोबतच त्यांची बालकेही येथे राबताना दिसतात. गुरूवारी या कामावर पाचवीत शिकणारा अर्जुन राठोड व सचिन राठोड तसेच चौथीत शिकणारी शीतल हे तिघेजण आई-वडिलांसोबत हातात खोऱ्या-टोपले घेऊन खडी अंथरत असताना दिसून आले. एकीकडे महाराष्ट्र शासन बालकामगारांच्या विरोधात काम करत असताना येथे मात्र राजरोसपणे बालकामगारांना राबवून घेतले जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या बालमजुरांशी संवाद साधला असता सध्या शाळेला सुटी असून, आई-वडिलांसोबत आम्हीही येथे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
मुलांच्या हातात खोऱ्या-टोपली
By admin | Published: March 31, 2017 12:03 AM