२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. २३ एप्रिल हा दिवस म्हणजे जगविख्यात विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस. शेक्सपिअरप्रमाणेच मिगुएल सर्व्हंटिस, गार्सिलोसो यांच्यासह आणखी काही प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू २३ एप्रिल रोजी झाला. त्यामुळे या लेखकांची आठवण म्हणून आणि जगभरात वाचन संस्कृती रुजावी म्हणून युनेस्कोतर्फे दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस पुस्तक दिन आणि कॉपीराईट दिन म्हणून साजरा केला जातो.
मागच्यावर्षीचा पुस्तक दिन आणि यावर्षीचा पुस्तक दिन असा तब्बल एक वर्षाचा कालावधी कोरोना आणि लॉकडाऊनचे विविध नियम यामध्ये अडकलेला होता. यावर्षी लहान मुलांच्या पुस्तकांची विक्री वेगाने मंदावलेली दिसून आली. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन शाळा. मुले आधीच खूप वेळ स्क्रीनसमोर असतात, त्यामुळे पुन्हा त्यांना ई- बुक वाचायला लावणे पालकांना अयोग्य वाटत होते. खूपच कमी पालकांनी दुकानात जाऊन मुलांसाठी पुस्तके आणायला यावर्षी प्राधान्य दिले.
चौकट :
ई- बुक्सने मारली बाजी
पालकांनी दुकानात येणे, प्रदर्शनातून मुलांसाठी पुस्तके घेऊन जाणे यासारख्या गोष्टी कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यावर्षी खूपच कमी केलेल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांसाठीच्या पुस्तकांची विक्री खूपच मंदावलेली आहे. त्या तुलनेत प्रौढ लोकांनी मात्र प्रत्यक्ष दुकानात येऊन पुस्तकांची खरेदी करणे टाळले असले तरी, ई- बुक्सच्या माध्यमातून भरपूर वाचन केल्याचे दिसून येते. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये ई- बुक्सचे वाचन जवळपास तिपटीने वाढलेले दिसून आले. यावर्षीही शनिवार- रविवार लॉकडाऊन घोषित होताच अनेक लोकांनी आवर्जून पुस्तकांची खरेदी केली. यामध्ये पहिली पसंती कथा- कादंबऱ्यांना, तर दुसरी पसंती मोटिव्हेशनल पुस्तकांना मिळालेली दिसली.
- साकेत भांड, प्रकाशक