- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : बालकांचे बालपण अगदी आनंदात जावे, कोणत्याही बंधनाशिवाय हा आनंद घेता यावा आणि भविष्यात एक चांगली व्यक्ती घडण्यासाठी आयुष्यात डोळ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे; परंतु डोळ्यातील दोषांमुळे अनेक बालकांच्या जीवनात अंधार पसरतो. मात्र, घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाने वर्षभरात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून २० बालकांच्या जीवनात नेत्ररूपी ‘प्रकाश’ पसरवला आहे.
मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, पडलेली पापणी अशा अनेक कारणांनी बालकांच्या दृष्टीत दोष निर्माण होतो. मोतीबिंदू हा केवळ ज्येष्ठांना होतो, हा समज आता मागे पडला आहे. जन्मत: बाळांमध्ये मोतीबिूंद आढळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अनेक बालकांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होतो. त्यामुळे येणारे अंधत्व हे केवळ डोळ्यांपुरतेच नसते, तर बालकांच्या संपूर्ण आयुष्यच अंधारात जाते; परंतु घाटीतील उपचारांमुळे अनेकांच्या आयुष्यातील हा अंधार दूर झाला.
नेत्र विभागात वर्षभरात बालकांच्या २० मोतीबिंदू, १५ तिरळेपणा, १ काचबिंदू, ८ पडलेल्या पापणीची आणि १५ डोळ्यांतून पाणी येण्यासंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मुदतपूर्व जन्मलेल्या ६ बालकांच्या नेत्रदोषावर लेझर तंत्रज्ञानानेही उपचार करण्यात आले. बालकांवरील अशा शस्त्रक्रियांसाठी सहयोगी प्राध्यापक डॉ. वैशाली लोखंडे-उणे यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी डॉक्टरांच्या मदतीने बालकांच्या पर्यायाने कुटुंबात पसरलेला अंधार दूर केला जात आहे. शस्त्रक्रियेसह बाह्यरुग्ण विभागात वर्षभरात १७०० बालकांवर औषधोपचार करण्यात आले.
नवजात शिशूंना दृष्टीजन्मल्यानंतर डोळ्यातील दोषामुळे नवजात शिशूंना काहीही आकलन होत नाही. त्यामुळे त्यांचा विकास खुंटतो; परंतु प्रसूतीनंतर डोळ्यातील दोष वेळीच ओळखून आता उपचार शक्य झाले आहेत. घाटीतील नेत्र विभागात सात आठवड्यांच्या बाळावरही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. उणे यांनी सांगितले. म्हणजे सात आठवडे ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे नेत्रदोष दूर करण्यासाठी गोरगरिबांचे आधारवड असलेले घाटी रुग्णालय महत्त्वाची भूमिका निभावत आहे.
बालकांनी तासभर मैदानात खेळावेलहान बालकांच्या डोळ्यात काही दोष असेल तर मूल मोठे झाल्यानंतर उपचार करू, असे अनेक पालक म्हणतात; परंतु जेवढ्या लवकर उपचार घेतला जाईल, तेवढा अधिक फायदा होतो. तिरळेपणात ८ ते १० वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दृष्टी वाढविता येते; परंतु त्यानंतर अवघड होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बालकांनी दररोज किमान एक तास मैदानात खेळले पाहिजे. त्यातून डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.- डॉ. वैशाली लोखंडे-उणे, सहयोगी प्राध्यापक, नेत्र विभाग, घाटी