छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने सिडको एन-८ भागातील नेहरू उद्यानात डिसेंबरअखेरपर्यंत बोटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह टीव्ही सेंटर भागातील स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी बुलेट ट्रेन सुरू केली जाईल. त्यामुळे सिडको-हडकोतील बच्चे कंपनीच्या दिवसभराच्या मनोरंजनाची सोय असेल, यामुळे मोबाइल- इंटरनेटच्या जंजाळातून सुटण्यासाठी लहान मुलांना शहरात कुठे फिरायला घेऊन जायचे, या प्रश्नांतून पालकांची सुटका होणार आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या नागरिकांना बच्चे कंपनीसह सिद्धार्थ उद्यानात जाणे शक्यही होत नाही. महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांतील उद्यानेही विकसित केली नाहीत. प्रशासक जी. श्रीकांत यांनी सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. शहरात एकाही उद्यानात बच्चे कंपनीसाठी बोटिंगची सोय नाही. सिद्धार्थ उद्यानात लहान मुलांसाठी कृत्रिम बोटिंगची व्यवस्था केली आहे. नैसर्गिक बोटिंगची व्यवस्था करावी, अशी सूचना प्रशासक यांनी केली. पूर्वी सलीम अली सरोवरात नौकाविहाराची सोय होती. कालांतराने ही सुविधाही बंद करण्यात आली. सिडको एन-८ भागातील नेहरू बाल उद्यानातील तलावाचा अनेक वर्षांपासून वापर होत नव्हता. त्यामुळे तलावात घाण साचली होती. तलाव स्वच्छ करून त्यात बोटिंग सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक कंत्राटदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या तलावाच्या परिसरात विहिरी असून, पाण्याचे झरेदेखील आहेत. त्यामुळे पाणी स्वच्छ आहे. आगामी महिनाभरात बोटिंगसाठी आवश्यक रॅम्प तयार करणे, तलावाची स्वच्छता अशी कामे केली जाणार आहेत.
नवीन वर्षात बोटिंग सुरू होणारमहापालिकेच्या वर्धापनदिनी म्हणजे ८ डिसेंबरला बोटिंग व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. ही ट्रेन जानेवारी महिन्यात सुरू होईल, असे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.-विजय पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक महापालिका.