केळगाव : सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, केळगाव, धावडा परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून मिरचीकडे वळू लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा मिरची पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. काही शेतकरी मिरची लागवडीसाठी आपल्याकडील असलेल्या पाण्याचा अंदाज घेऊन मिरचीची लागवड करीत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी पारंपरिक पिकातील मका, कपाशीच्या लागवडीचा खर्च देखील निघाला नाही. मिरची या नगदी पिकामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दोन ते अडीच महिन्यात उत्पन्नाला सुरुवात होत असल्यामुळे मागच्या वर्षी प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात काही प्रमाणात का होईना मिरची लागवडीकडे वळला होता. यावर्षी देखील शेतकरी मिरची लागवडीकडे पुन्हा वळला आहे. मिरची लागवड करण्यासाठी रोपेसुद्धा परिसरातील रोपवाटिकेतून शेताच्या बांधावर मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मिरची लागवडीला सुरुवात झाली आहे.
कमी क्षेत्रात कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळायला सुरुवात झाल्याने लोक मिरची लागवडीकडे वळाले आहेत. ठिबक सिंचनचा वापर करून कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळत आहे. येत्या काळात मिरची पिकाला भाव राहणार का नाही अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे. - बाळासाहेब इवरे, व्यापारी,
मल्चिंग पेपरचा वापर करून शेतकरी मिरचीची लागवड करीत आहे. याचा फायदा मिरची लागवड केल्यानंतर पाणी कमी प्रमाणात लागते. गवत होत नाही. मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. - काकासाहेब कोल्हे, शेतकरी, केळगाव
फोटो : केळगाव येथील दत्तू मुळे यांच्या शेतातील मिरची लागवड करण्यात सुरुवात झालेली आहे.
फोटो : मिरचीचे रोपे नर्सरीतून थेट शेताच्या बांधावर दिली जात आहेत.