आळंद : फुलंब्री तालुक्यातील आळंद शिवारातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. उत्पन्न चांगले होईल, या अपेक्षेने लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही केला. उत्पन्नही चांगल्या प्रमाणात निघत आहे; मात्र जास्त प्रमाणात आवक झाल्याने मिरचीचे भाव कोसळून ४० रुपये किलोप्रमाणे विक्री झालेले मिरचीचे भाव १८ ते २० रुपये किलोवर आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे खर्चाच्या मानाने कमी पैसे हातात येणार असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
फुलंब्री तालुक्यातील आळंद, उमरावती, जातवा, सताळा बु., पिंपरी, नायगव्हाण, खामगाव व परिसरातील शेतकरी पारंपरिक पिकांबरोबर नगदी पैसे पीक म्हणून मिरची लागवड करीत आहेत. दरवर्षी चांगला भाव मिळत असल्याने यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली. त्यासाठी रोप, ठिबक, खते, औषध यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही केला. गत महिन्यात ३८०० ते ४००० प्रति क्विंटल भाव असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या; मात्र सर्वच शेतकऱ्यांची मिरची तोडणीसाठी आली. बाजारात आवक वाढली व मिरचीचे भाव चार हजाराहून १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलवर आले.
----