औरंगाबाद : घराकडे चाललेल्या ५ वर्षीय चिमुकलीला पाठीमागून आलेल्या मोकाट कुत्र्याने अचानक चावा घेतला. या आघाताने मुलगी जमिनीवर पडली, त्यानंतर कुत्र्याने मांडी, पोटरी, पाय अशा ७ ठिकाणचे लचके तोडले. मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन व्यक्तीने त्या चिमुकलीची सुटका केली. या घटनेने सिडको एन ६ परिसरातील साईनगरात कुत्र्यांची दहशत पसरली.
येथील विश्वंभर बडक यांची साडेपाच वर्षांची मुलगी मनस्वी हिला गाईचा लळा आहे. या परिसरातील गाईंना ती रोज पोळी देते. बुधवारी सकाळी ती खेळणीतील तलवार घेऊन खेळत खेळत गाईच्या दर्शनाला गेली. येथील गार्डनमध्ये एका कुत्रीने काही दिवसांपूर्वीच पिल्लांना जन्म दिला. त्या कुत्रीने अचानक पाठीमागून येऊन मनस्वीला चावा घेतला. यात तिचा फ्रॉक ओढला गेल्याने ती खाली पडली. कुत्रीने तिच्या डाव्या पायाच्या मांडीवर, दोन्ही पायाच्या पोटरीवर आदी ७ ठिकाणी चावा घेतला. त्यातील ३ जागेवर दात आत घुसले. या घटनेने चिमुकली घाबरून गेली. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तीने त्या कुत्रीच्या तावडीतून मनस्वीची सुटका केली. जवळच राहणाऱ्या अरुणा तरटे या महिलेने तिला घरी पोहोचविले. या घटनेने परिसरातील लोकांनी आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी दिवसभर बाहेर पाठवले नाही.
चौकट
काका त्या कुत्र्याला काठीने मारा
सदर प्रतिनिधीने मनस्वीची घरी जाऊन भेट घेतली तेव्हा, ती रडत म्हणाली की, काका त्या कुत्र्याने मला खाली पाडले व चावले त्यास सोडू नका. त्याला काठीने मारा.
चौकट
कुत्र्याला बघितले की ती रडते
मनस्वीच्या मनात एवढी भीती बसली की, आम्ही इंजेक्शनसाठी घाटीत जाताना व येताना रस्त्यात कुत्रा दिसला की ती रडत होती. भटक्या कुत्र्याचा सुळसुळाट झाला असून मनपाने त्यांचा बंदोबस्त करावा.
प्रियांका बडक ( मनस्वीची आई)
--
१५ दिवसांपूर्वी मला, नातवाला चावली कुत्री
मी साईनगर मध्येच राहते. मनस्वीला जी कुत्री आज सकाळी चावली तीच १५ दिवसांपूर्वी मला व २ वर्षीचा नातू वरदला चावली होती. मी सकाळी फुले वेचण्यासाठी घराबाहेर आले असता मनस्वीला ती कुत्री चावत असल्याचे मी बघितले.
अरुणा तरटे ( रहिवासी)