---
औरंगाबाद : जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होताना पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सध्यातरी प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत कुठल्याही हालचाली नाहीत. ऑनलाइन शिक्षणामुळे पहिली ते चाैथीचे चिमुकली अद्याप उन्हाळी सुट्यांच्या फीवरमधून बाहेर पडली नसल्याने पालकांना चिंता सतावू लागली आहे. शाळा बंद असल्याने सुटीच्या मूडमधून चिमुकली बाहेर पडली नसल्याने विद्यार्थ्यांचा पायाच कच्चा राहील, अशी पालकांना भीती वाटते.
अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे संच मिळालेले नाहीत. ब्रीज कोर्स सुरू झाला मात्र, त्याच्या पीडीएफ फाइलच्या प्रिंट पुस्तकांपेक्षा महागात पडत असल्याने परवडण्याऱ्या नाहीत. ग्रामीण भागातील समस्या त्याहीपेक्षा वेगळ्या आहेत. एका घरात एकच मोबाइल. त्यावर मोठी भावंडे शिकतील की लहान, अनेकांकडे ॲण्ड्राइड मोबाइल नाहीत. रेंजच्या अडचणी, त्यात ऑनलाइनला प्रत्यक्षात ४० टक्केही मुलांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्र करणे शिक्षकांसाठी आव्हान ठरत आहे. प्रत्यक्ष वर्गात शिकताना एकत्र कविता, प्रार्थना, अक्षर, अंक, प्राणी, पक्ष्यांची तोंडओळख सोपी होते. गेल्या वर्षी पहिलीतील विद्यार्थी थेट दुसरीत गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहण्याची भीती शिक्षकांसह पालकांतून व्यक्त होत आहे.
---
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
-कुणीतरी आले, पाणी प्यायचे, भूक लागली, झोप येतेय अशी कारणे चिमुकली देत आहेत.
-ऑनलाइन वर्गाचा अभ्यास दिल्यावर थोडावेळ खेळतो, कार्टून पाहून लगेच अभ्यास करतो, असे म्हणून टाळाटाळ करतात.
-मोबाइल जवळ असल्यावर क्लासची विंडोसोबत गेमची विंडो सुरू करतात. त्यामुळे वर्गापेक्षा खेळावर विद्यार्थ्यांचे लक्ष जास्त असते.
-पूर्वी चार ते पाच तास शाळेत घालवणारी मुले आता तासभर एका जागी बसून एकाग्रतेने अभ्यासाला कंटाळा करतात, असे पालकांचे म्हणणे आहे.
----
आपल्या घरातूनच अभ्यास बरा
---
कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला तरी धोका टळलेला नाही. या कारणास्तव शाळा ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. आणखी काही महिने तरी ऑनलाइन शिकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कामांतून, गोष्टींतून, गप्पांतून नवीन संकल्पनेने विषय समजावून द्यावेत. दैनंदिन कामातून आकडेमोड आणि अक्षर ओळख करून द्यावी. सहज बोलताना गाणी, कविता म्हणून घ्याव्यात आणि त्यांना अभ्यासाचे धडे द्यावेत, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
----
पालकांची अडचण वेगळी
--
कार्यालयीन ऑनलाइन बैठका, त्याच वेळी विद्यार्थ्यांचे वर्ग यातून पाल्य ऑनलाइन वर्गात काय करतोय यावर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तिकडे पूर्णवेळ लक्ष दिले तर इतर कामांकडे दुर्लक्ष होत आहे.
- दिलीप सपकाळ, पालक
----
शेतीची कामे सुरू झाल्याने घरी मुलांजवळ कुणाला तरी एकाला थांबावे लागते. शेतात मुलांना नेऊ शकत नाही. तिथे ते शिकण्यापेक्षा इतरत्र धिंगाना घालतात. लक्ष दिले नाही तर मोबाइलवर क्लास सोडून गेम्स खेळत बसतात.
-दीपाली पंडित, पालक
--
वर्गनिहाय विद्यार्थी
--
पहिली -८८,३२९
दुसरी -८८,१८९
तिसरी -८८,२०२
चौथी -८९,२११