लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : इमारतीच्या दुस-या मजल्यावर खेळत असताना अचानक तोल जाऊन पडल्यामुळे एक दोन वर्षांचा चिमुकला मृत्यूमुखी झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. दुसºया वाढदिवसापूर्वीच या चिमुकल्यावर काळाने अचानक घाला घातल्यामुळे बजाजनगरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, संतोष शिंदे (रा. खंडाळा, ता. वैजापूर) हे वाळूज एमआयडीसीतील बडवे इंजिनिअरिंग या कंपनीत कामगार आहेत. ७ महिन्यांपूर्वी संतोष शिंदे यांनी बजाजनगरातील सेवागिरी हाऊसिंग सोसायटीतील जगन्नाथ दांडेकर यांच्या इमारतीत दुसºया मजल्यावर रूम भाड्याने घेतली. पत्नी आम्रपाली व लहान मुलगा देवांश ऊर्फ दादू यांच्यासह ते तेथे वास्तव्यास आहेत. आज गुरुवारी सकाळी संतोष शिंदे हे कंपनीत कामासाठी निघून गेले होते, तर त्यांची पत्नी आम्रपाली व चिमुकला देवांश हे दोघेच घरी होती. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आम्रपाली शिंदे या घरात फरशी पुसत होत्या, तर देवांश ऊर्फ दादू हा घरात खेळत होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास भाजीपाला विक्रेता या सोसायटीत आला होता. या भाजीपाला विक्रेत्याचा आवाज ऐकून आम्रपाली शिंदे या भाजीपाला खरेदी करण्यासाठी दुसºया मजल्यावरून खाली आल्या. दरम्यान, घरात खेळत असलेला देवांश हा अचानक गॅलरीत आला व कमी उंचीच्या संरक्षक जाळीवर चढला. याचदरम्यान देवांश याचा लोखंडी जाळीवरून तोल जाऊन तो दुसºया मजल्यावरून खाली जमिनीवर पडला. या इमारतीच्या जवळपास २० फूट उंचीवरून पडल्यामुळे जोराचा आवाज झाला अन् शेजाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार लक्षात येताच आम्रपाली या धावतच चिमुकल्याजवळ पोहोचल्या. त्यांना देवांश बेशुद्ध पडलेला दिसून आला. त्यामुळे त्या देवांश यास कवेत घेऊन अनवाणीच बजाजनगरातील रुग्णालयाकडे धावत सुटल्या. हा प्रकार पाहून एक अनोळखी युवक या माय-लेकरास बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र, डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी शहरातील रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्यामुळे तो युवक रिक्षातून या दोघांना शहरातील खाजगी रुग्णालयात घेऊन गेला. या घटनेत डोक्यावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या देवांश ऊर्फ दादू याची उपचारादरम्यान दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालविली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. शेवगे करीत आहेत.प्रेमाने त्याला दादू म्हणत...संतोष व आम्रपाली या दाम्पत्यास दोन वर्षांपूर्वी मुलगा झाला. त्याचे देवांश असे नामकरण करण्यात आले होते. आई-वडील त्यास प्रेमाने दादू म्हणून त्याचे लाड करीत होते.४ पुढील महिन्यात ९ जानेवारीला देवांश ऊर्फ दादू याचा दुसरा वाढदिवस असल्यामुळे त्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याची तयारी शिंदे या दाम्पत्याने केली होती.४दुसºया वाढदिवसांपूर्वीच अचानक देवांश ऊर्फ दादू यास काळाने हिरावून नेल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला असून, चिमुकल्याच्या आठवणीमुळे त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. या घटनेमुळे बजाजनगरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
इमारतीवरून पडून चिमुकला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:44 AM