औरंगाबाद : साताऱ्यातील साई संस्कृती सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर खेळताना एका अडीच वर्षीय बालकाने घराच्या दरवाजाच्या कड्या लावल्या अन् त्या उघडाव्या कशा हे त्यालाही सुचेना अन् बाथरूममध्ये अडकलेल्या आजीलाही काही कळेना. त्यामुळे दोघेही अडकून पडले. अखेर अग्निशामक विभागाने खिडकीतून आत प्रवेश करीत दरवाजा उघडून श्रेयस सुनील ताडे हा बालक व आजीस सुखरूप बाहेर काढले अन् नातेवाईकांचा व सोसायटीतील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
अग्निशामक दलाला मंगळवारी दुपारी १२.५७ मिनिटांनी कॉल आला अन् सिडको विभागाची गाडी ‘सायरन’ वाजवीत साताऱ्याच्या दिशेने निघाली. साई संस्कृती गट नं. १६४ येथे येऊन थांबली. आग कुठे लागली, असा समज परिसरात झाल्याने नागरिकांनी गर्दी केली; परंतु प्रकरण काही वेगळेच होते. साई संस्कृतीच्या प्लॅट नं. बी-२४ मधील स्वरांजली नचिकेत बेडेकर यांच्याकडे त्यांचा भाऊ आला होता. त्यांचा अडीज वर्षांचा श्रेयस आणि आजी घरात होत्या. काही कामानिमित्त स्वरांजली खाली आल्या होत्या.
गंमत झाली अशी की, सुरक्षेच्या कारणामुळे फ्लॅटचा दरवाजा आॅटो लॉक, तावदाने, फर्निचर अगदी मजबूतच असावे असा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. येथे आॅटो लॉकमुळे घराचा दरवाजा बंद झाला अन् खेळताना चिमुरड्याने दरवाजाची खालची व दुसरी कडी बंद केली. घरात आजीबाई होत्या. त्या बाथरूमला गेल्या अन् चिमुकल्याने बाथरूमचाही दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामुळे आजी आतच अडकल्या आणि चिमुकला हॉलमध्ये खेळताना सोप्यावर झोपी गेला. स्वरांजली बाहेरून आल्या व दार ठोठावून ठोठावून परेशान झाल्या. दरवाजा खुलता खुलेना. त्यामुळे त्यांनी अग्निशामक दलाला कॉल केला.
सुखरूप सुटकाइमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट असल्याने जवानांनी सिडी लावून गॅलरीत प्रवेश केला व घरातील इतर दरवाजे उघडले व मुख्य दरवाजाची कडी काढली अन् आत अडकलेल्या आजी व नातवांची सुटका केली.
‘तो’ चिमुकला गेला झोपीआजी बाथरूममध्ये गेल्यानंतर श्रेयसने बाथरूमचा दरवाजा लावला, मुख्य हॉलचा दरवाजा लावला. आजी दार उघड, असा आवाज देऊ लागल्या; परंतु त्याला तो दरवाजा उघडता येत नव्हता. अखेर तो सोफ्यावर झोपी गेला अन् हे नाट्य घडले.