औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या २०१९ ते २०२४ पर्यंतच्या औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही उद्योग औरंगाबादेतील आॅरिक सिटीमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. स्थानिक पातळीवर याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही.
चीन येथील वॅनफेंग आॅटो होल्डिंग गु्रपने औरंगाबाद, रायगड आणि तळेगाव येथील औद्योगिक वसाहतींतील जागांचा विचार केल्याची माहिती उद्योग वर्तुळातून पुढे आली आहे. अॅल्युमिनिअम अलॉय व्हील्सचे उत्पादन करणारी ही कंपनी सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणूक करून उद्योग उभारण्याचा विचार करीत आहे. सदरील कंपनीला २०० एकर जागेची गरज आहे. शेंद्रा एमआयडीसीलगत असलेल्या आॅरिक सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे.
विविध क्षेत्रांत उत्पादनकंपनीचे उत्पादन युरोप व इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाते. मशीन टूल्स, इलेक्ट्रिक बसेससाठी लागणाऱ्या उपकरणांचे उत्पादन कंपनी करते. शिवाय आॅटोमोबाईल्स क्षेत्रातील उत्पादनेही कंपनी करते. किया मोटार्स या अँकर प्रोजेक्टसह एलजी कंपनी आॅरिकमध्ये येता-येता राहिली. येथील औद्योगिक वसाहतींत आॅटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे एलजी किंवा किया मोटार्ससारखे उद्योग येथे आले असते, तर व्हेंडर डेव्हलपमेंटसाठी मोठी चालना मिळाली असती. ह्योसंग या वस्त्रोद्योगातील कंपनीचे बांधकाम सध्या आॅरिकमध्ये सुरू आहे.