औरंगाबाद : चितेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालय अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुरू झाल्याची माहिती अवैध गर्भपातप्रकरणी नेमण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीसमोर आली आहे. सोनोग्राफी करण्यापासून तर अवैध गर्भपात करणाऱ्यांपर्यंत सर्वांचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयात अवैध गर्भपात करून किती कळ्या फुलण्याआधीच खुडल्या, याचा शोध घेतला जाईल.
अवैधरीत्या गर्भपात केल्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने महिला घाटी रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर पोलिस, आरोग्य विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री चितेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयावर छापा टाकला आणि हा प्रकार उघड झाला. याची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोग विभागप्रमुख डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. अनेकांचे गर्भपात या ठिकाणी केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने चौकशीसाठी ही समिती पोलिसांना मदत करणार आहे.
सोनोग्राफी कुठे केली?गर्भपातापूर्वी सोनोग्राफी करण्यात आली आणि त्यातून गर्भ मुलीचा स्पष्ट झाल्यानंतरच अवैधरीत्या गर्भपात करण्यात आला. त्यामुळे ही सोनोग्राफी कुठे करण्यात आली, हे पोलिसांच्या तपासांतून स्पष्ट होईल.
महिला ‘बीएचएमएस’ डाॅक्टर, पुरुष डाॅक्टर बोगसची शक्यताछाप्यादरम्यान महिला ‘बीएचएमएस’ डाॅक्टर असल्याचे प्रमाणपत्रावरून समोर आले आहे. परंतु, पुरुष डाॅक्टराचे कोणतेही प्रमाणपत्र सापडलेले नाही. त्यामुळे हा डाॅक्टर बोगस असल्याची शक्यता चौकशी समितीने वर्तविली.
काय असते ‘एमव्हीए सीरिंज’ ?छाप्यादरम्यान या रुग्णालयात ‘एमव्हीए सीरिंज’ सापडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अवैध गर्भपाताचा उद्योग सुरू असल्याचे जवळपास निश्चित आहे. याचा वापर कमी आठवड्यातील आणि नियमानुसार होणाऱ्या गर्भपातासाठी केला जातो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
दोन मुली, आधीही गर्भपात अन् आताही...अवैध गर्भपात करण्यातून प्रकृती गंभीर झालेल्या २७ वर्षीय महिलेवर घाटीत उपचार सुरू आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रविवारी या महिलेला ‘आयसीयू’तून वाॅर्डात हलविण्यात आले. या महिलेला दोन मुली आहे. या महिलेचा यापूर्वीही गर्भपात झालेला आहे. आताही गर्भपात करण्यात आला. मुलीचाच गर्भ असल्याचे कळल्यानंतच गर्भपात करण्यात आल्याची शक्यता घाटीतील डाॅक्टरांनी वर्तविली. परंतु, महिला व तिचे नातेवाईक आता वेगवेगळी उत्तरे देत आहेत.
गर्भ मुलीचा की, मुलाचा? तपासणीतून स्पष्टया महिलेच्या पाच महिन्यांच्या गर्भाची आता न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यातून हा गर्भ मुलीचा की मुलाचा, हे स्पष्ट होणार आहे.