औरंगाबाद : चार वर्षांपूर्वी शहरात गाजलेल्या डॉ. चित्रा डकरे खून प्रकरणातील आरोपी युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.३) सायंकाळी उघडकीस आली. अमोल नारायण घुगे (२२, रा. शिवनेरी कॉलनी, सिडको), असे मृताचे नाव आहे.
२०१५ साली शहरात झालेल्या डॉ. चित्रा डकरे (रा. अमरावती) यांच्या खुनातील आरोपी असलेला अमोल घुगे हा ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून बेपत्ता होता. अमोलच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने सिडको पोलीस ठाण्यात अमोल बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी एन-७ सिडको परिसरात असलेल्या अयोध्यानगरीतील नाल्याच्या ढाप्यातून दुर्गंधी येत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर सिडको पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नाल्याचा ढापा उघडला असता त्यात अमोलचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अग्निशामक विभागाच्या पथकाला पाचारण करून नाल्यातील मृतदेह शासकीय दवाखान्याकडे रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आला आहे.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने घेतले नमुनेमारेकऱ्यांनी अमोलचा खून करून तो नाल्यात टाकून ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण केले. आय बाईकच्या पथकाने सदरील घटनास्थळ रेखांकित केले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने नाल्यात उतरून काही नमुने जमा केले आहेत.
संशयितांची धरपकडअयोध्यानगर नाल्यात सापडलेल्या अमोलचे मित्र आणि संशयितांची पोलिसांनी शोधमोहीम राबविली. त्यानंतर रात्री उशिरा शुभम विसपुते, गौरव वानखेडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले.