लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य निवडीवरून भाजपातील मतभेद कायम राहिल्याने पक्षाच्या सदस्याची निवड होवू शकली नाही़ राष्ट्रवादीचे विष्णू नवले यांची मात्र यावेळी निवड जाहीर करण्यात आली़ तर काँग्रेसच्या तीन जागांसाठी अर्जच आले नसल्याने पुढील सर्वसाधारण सभेत या पक्षाच्या सदस्यांची निवड केली जाईल, असे सभागृहात सांगण्यात आले़ महानगरपालिकेचीे गुरुवारी सकाळी ११ वाजता शहरातील बी़ रघुनाथ सभागृहात महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. व्यासपीठावर उपमहापौर माजू लाला, आयुक्त राहुल रेखावार, नगर सचिव मुकूंद कुलकर्णी यांची उपस्थिती होती़ सभेच्या प्रारंभीच स्विकृत सदस्य निवडीचा विषय पटलावर घेण्यात आला. नगर सचिव कुलकर्णी यांनी काँग्रेसच्या कोट्यातील ३ सदस्यांसाठी एकही अर्ज आला नसल्याचे तर राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी विष्णू नवले यांचा १ व भाजपाच्या एका जागेसाठी दिलीपसिंग ठाकूर यांचा एक अर्ज आला आहे; परंतु भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाने आलेल्या पत्रात मधुकर गव्हाणे यांचे नाव असल्याचे नमुद केले आहे, असे सांगितले. यावेळी झोल्या चर्चेमध्ये भाजपाचे गटनेते मोकींद खिल्लारे यांनी स्वीकृत सदस्यासाठी १२ जून रोजी विहित वेळेत भाजपाकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार दिलीपसिंह ठाकूर यांची निवड करावी, असे सभागृहात सांगितले़ यावर सभागृहाकडून आयुक्त राहुल रेखावार यांनी भाजपाकडून विहित वेळेत स्वीकृत सदस्यासाठी दिलीपसिंह ठाकूर यांचा एक अर्ज प्राप्त झाला आहे़; परंतु, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाचे मधुकर गव्हाणे यांची स्वीकृत सदस्य पदासाठी नियुक्ती करावी, असे पत्र मनपाला प्राप्त झाले आहे़ त्यामुळे यावर इतक्यात निर्णय घेणे शक्य नाही़ याविषयी कायदेशिर बाबी तपासून पुढील सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्याची निवड केली जाईल, असे सांगितले़ त्यावर खिल्लारे यांनी गटनेत्यांनी निवडलेल्या स्वीकृत सदस्याचीच निवड करावी, यामध्ये आपण वेळ वाया घालू नये, याच सभेतच निवड करावी, अशी मागणी केली. तसेच आयुक्त रेखावार यांच्यावर त्यांनी पक्षपातीपणाचा आरोप केला. यावरून रेखावार व खिल्लारे यांच्यात वादावादीही झाली; परंतु, आयुक्त त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे कोणताच निर्णय झाला नाही़ त्यावर काँग्रेसचे गटनेते भगवान वाघमारे यांनी काँग्रेसच्या वतीने निवडण्यात येणाऱ्या ३ स्वीकृत सदस्यांसाठी येणाऱ्या सभेमध्ये चर्चा करण्यात यावी, असे मत मांडले़ राष्ट्रवादीच्या वतीने विजय जामकर यांनी काँग्रेस व भाजपाची स्वीकृत सदस्य निवडण्याची प्रक्रिया केव्हा घ्यायची तेव्हा घ्या़ परंतु, आमच्या पक्षाकडून निवडलेल्या स्वीकृत सदस्याची या सभेत घोषणा करावी, असे म्हणणे मांडले़ त्यानुसार महापौर वरपूडकर व आयुक्त रेखावार यांनी राष्ट्रवादीकडून अॅड़ विष्णू नवले यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले़ यावेळी मनपा सदस्यांमधून बाजार समितीवर पाठविण्यात येणाऱ्या एका सदस्याची निवडही पुढे ढकलण्यात आली़ या सभेमध्ये घंटा गाडीवर चर्चा करण्यात आली़ यामध्ये शहरासाठी ६५ घंटागाडी उपलब्ध आहेत़ त्यात पुन्हा १५ नवीन गाड्या दाखल होणार आहेत़ तसेच जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी घालण्यासाठी व्हेईकल ली मीटर बसविण्यास मान्यता देण्यात आली.
भाजपच्या सदस्याची निवड लटकली
By admin | Published: June 15, 2017 11:31 PM