साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये नोकरीची गॅरंटी नसल्याने अनेकांनी ‘छोकरी’ची निवड लांबणीवर टाकली आहे. परंतु दोनाचे चार हात करून टाक, दिसं येतील दिसं जातील... भोग सरलं... सुख येईल, असे म्हणत लग्नाचा बार उडविण्यात अनेक कुटुंबेदेखील आघाडीवर राहिली आहेत. दुय्यम निबंधक वर्ग २ यांच्याकडे लॉकडाऊन काळातही अनेकांनी रितसरपणे नोंदणी विवाहाला पसंती दिलेली आहे. अनेकांनी नोकरी नसल्याने छोकरी पाहण्याचे कार्यक्रमच लांबणीवर टाकले आहेत. २०१८ ते २०२१पर्यंत जुलै महिन्यातील रजिस्टर नोंदणीनुसार अनेकांनी लॉकडाऊनमुळे चालीरिती, पाहुण्यांचा गराडा, रिकामा खर्च टाळून, धुमधडाका टाळत शुभमंगल उरकली आहेत. परंतु चांगली नोकरी व पगारदार मुलगीदेखील पाहिजे, अशा बहुतांश परिवारांनी शुभमंगलचे बेत टाळलेले दिसत आहेत. जवळचा पैसा खर्च करून दुखप्रसंगी दवाखान्यात काय खर्च करायचे, की कुढत राहायचे, असाच विचार बहुतांश कुटुंबांनी केल्याचे दिसून आले आहे.
कधी किती झाले नोंदणी विवाह....
वर्ष नोंदणी विवाह
२०१८ - २२७
२०१९ - ४९५
२०२० - ३०८
२०२१ - २३६
सहा महिन्यांत ४० टक्के नोंदणी विवाह
लॉकडाऊन काळात लोकसंख्या उपस्थितीची परिस्थिती व नियम, अटींच्या प्रश्नामुळेच दोन्हीकडील कुटुंबीयांनी ही पावले उचलली असावीत. सहा महिन्यांत जवळपास ४० विवाहांची नोंदणी झालेली आहे.
- अक्षय सुगंधी, प्रभारी दुय्यम निबंधक
- सहा महिन्यात अधिक नोंदणी...
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काही नियम, अटी पाळून विवाह नोंदणीकडे नोकरी व व्यवसाय नसल्यामुळे काहींनी नकार दिला असला तरी अधिक लोकांनी पसंती दिली आहे.
- गतवर्षीच्या तुलनेत अवघ्या सहा महिन्यांतच २३६पर्यंत ही नोंदणी पोहोचली आहे. त्यामुळे अधिक विवाहाची गती वाढली आहे. खर्चाला फाटा देत विवाह उरकण्यात आले आहेत.
- विवाह लांबणीवर टाकण्यापेक्षा कमी खर्चात अगदी सोयीच्या पद्धतीने कमी नागरिकांत विवाह होत असेल तर ही संधी कोण सोडणार, याच उद्देशाने विवाहासाठी तयारी झालो.
- युवक ( प्रतिक्रीया)
- नोकरीच नसल्याने मुलीच्या घरच्यांनीच नकार दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नोकरी मिळाल्यावरच विवाहाचा बेत आहे. ही बाब जगजाहीर आहे. सध्या नोकरी शोध बघू, मग छोकरी.
- विवाहेच्छूक तरुण (प्रतिक्रिया)