लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शिरूर कासार तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत म्हणून ह.भ.प. शिवाजी महाराज यांची विश्वस्तांनी बहुमताने केलेली निवड ही घटनेनुसारच असल्याचा निकाल सहायक धर्मदाय आयुक्त लातुर यांनी दिला आहे. याविरु द्धचे अपील त्यांनी फेटाळून लावले.श्री. क्षेत्र नारायण गड संस्थानाचे मठाधिपती महंत ह.भ.प. महादेव महाराज गुरूमाणिक महाराज हे १९ जुलै २०११ रोजी वैकुंठवासी झाले. त्यामुळे संस्थानाच्या विश्वस्थांनी तातडीची सभा बोलावून आपल्या घटनात्मक अधिकारानुसार २० जुलै रोजी वै. महादेव महाराज यांच्या जागी त्यांचे वारस ह.भ.प. शिवाजी महाराज यांची लाखो भक्तांच्या उपस्थितीत निवड केली. यावेळी संस्थानाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, दिलीप गोरे, अॅड.महादेव तुपे, भीमराव मस्के, प्रा. जनार्धन शेळके, महादेव लाटे, भागवत परजणे यांची उपस्थिती होती. निवड झाल्यानंतर वै. ह.भ.प. महंत महादेव महाराज यांचा समाधी सोहळा व सर्व धार्मिक विधी हा वारस व महंत म्हणून ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या हस्ते भाविकांच्या साक्षीने पार पडला.दरम्यान, संस्थानाचे महंत म्हणून नोंदणीसाठी सहायक धर्मदाय आयुक्त बीड यांच्याकडे विश्वस्तांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्या बदल अर्जाविरूद्ध भागवत बळीराम गायकवाड यांनी आक्षेप नोंदविला. आक्षेप अर्ज आल्यानंतर अर्जदार व त्यांचे साक्षीदाराचे तोंडी साक्षीपुरावे नोंदविण्यात आले. त्यावर निर्णय देत सहायक धर्मदाय आयुक्त बीड यांनी ह.भ.प. शिवाजी महाराज यांची विश्वस्तांनी बहुमताने केलेली निवड ही घटनेनुसारच असल्याचा निकाल दिला होता.त्यानंतर भागवत गायकवाड यांनी सदर निर्णयाच्या विरोधात सहायक धर्मदाय आयुक्त लातुर यांच्याकडे अपील केले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व सर्व कागदपत्र तपासल्यानंतर सहायक धर्मदाय आयुक्त हर्लेकर यांनी अपील फेटाळून लावत बीडच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सदरील प्रकरणात ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या वतीने अॅड. डी.एन. सुर्यवंशी व अॅड. पी.आर. आर्सुळ यांनी काम पाहिले.
नारायणगडाच्या महंतांची निवड घटनेनुसारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:20 AM