औरंगाबाद : ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर राज्यभर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) जारी करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत मंगळवारपासून रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातदेखील ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी असेल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे नाताळ व नववर्षाच्या स्वागतावर नाइट कर्फ्यूमुळे विरजन पडले आहे.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, ‘रात्री १०.३० वाजेनंतर जे हॉटेल, आस्थापना, दुकाने सुरू राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या संचारबंदीत प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत संचारबंदी असणारच आहे. शिवाय ग्रामीण पोलीस हद्दीत असलेले ढाबे, हॉटेल्स यावरदेखील प्रशासनाची नजर असणार आहे.’
विमानतळावर तपासणी कडक करण्यात येणार आहे, तसेच झालर क्षेत्र आणि ग्रामीण हद्दीतील ढाबे, हॉटेल्स या संचारबंदीच्या काळात बंद असतील.
पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले, ‘रात्रीची संचारबंदी पाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे. १५ दिवसांसाठी ही संचारबंदी आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महत्त्वाचे काम नसेल, तर कुणीही घराबाहेर पडू नये. १४४ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर येऊ नये. मात्र, जे ऐकणार नाहीत, त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल.’
काय सुरू राहणार
आरोग्यसेवा, मेडिकल दुकाने, रात्रपाळीतील उद्योग सुरू राहणार आहेत. रात्रपाळीवरून घराकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे संस्थेचे ओळखपत्र आवश्यक आहे. मालवाहतूक, उद्योग, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहील.
बंद काय राहणार?
रात्री १०.३० वाजेनंतर हॉटेल्स बंद राहतील. बाजारपेठा बंद राहतील. पाचपेक्षा जास्त लोक जमतील, असे कोणतेही ठिकाण सुरू राहणार नाही. सकाळी ६ वाजेनंतर रात्री ११ वाजेपर्यंत दैनंदिनी सुरू राहील.
लग्नसमारंभांवर करडी नजर
५० पेक्षा जास्त नागरिकांना लग्नसमारंभात निमंत्रित करू नये, अशी नियमावली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असताना याचे उल्लंघन होत आहे, अंत्ययात्रेसाठीदेखील गर्दी होत आहे. नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी लग्नसमारंभांवर करडी नजर ठेवण्यासाठी विशेष पथक कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अचानक छापा मारणार
रात्रीच्या संचारबंदीचे कुणीही उल्लंघन करू नये. पोलीस यंत्रणेने काही स्पॉट निश्चित केलेले आहेत. त्याठिकाणी अचानक छापा मारून तपासणी करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिला.