औरंगाबाद : गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोनाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ नको, देशातील पर्यटन स्थळेच बरी, असे नाताळ आणि नववर्षानिमित्त पर्यटक म्हणत आहेत.
नाताळची सुटी म्हटली की गोव्याला जायचे, असे समीकरण काही वर्षांपासून दिसून येत आहे. नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्याला जाण्यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गोव्यासह नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जवळपास १५ हजार शहरवासीयांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळणार आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे, विमान आणि खासगी बसची बुकिंग नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘फुल्ल’ झाली आहे.
गोव्यासाठी विशेष रेल्वेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या ठिकाणी जाण्यासाठी अन्य वाहतूक सुविधांचा आधार घ्यावा लागत आहे. गोव्यापाठोपाठ बंगळुरू, म्हैसूर, केरळ, हिमाचल प्रदेशकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, अजिंठा एक्स्प्रेससह विविध रेल्वे गाड्यांचे आरक्षण आगामी काही दिवसांतील वेटिंगवर गेले आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबादला जाणाऱ्या विमानाचेही बुकिंग ‘फुल्ल’ होत असल्याचे इंडिगोच्या सूत्रांनी सांगितले.
हाॅटेलची बुकिंग ‘फुल्ल’बुकिंगचा विचार करता औरंगाबादहून किमान १५ हजार नागरिक पर्यटनाला जाणार आहेत. औरंगाबादेतील हाॅटेलचीही आगामी ५ दिवसांतील बुकिंग जवळपास ‘फुल्ल’ आहेत. कोरोनामुळे जानेवारी, फेब्रुवारीत पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन
रिफंड मिळेल का, अशी विचारणाआगामी दिवसांतील आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बुकिंग करणारे गेल्या दोन दिवसांपासून प्रवास रद्द झाला तर रिफंड मिळेल का, अशी विचारणा करीत आहेत. सध्या देशातील पर्यटन स्थळांना जाण्यास पसंती आहे.- आशुतोष बडवे, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद
गोव्यासाठी रोज २ ट्रॅव्हल्सगोव्यासाठी औरंगाबादहून दररोज २ ट्रॅव्हल्स रवाना होतात, अशी माहिती औरंगाबाद बस ओनर्स असोसिएशनचे सचिव मोहन अमृतकर यांनी दिली. मुंबई, पुणे, नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सध्या खासगी बसगाड्यांना गर्दी होत आहे.