लालखॉं पठाण
गंगापूर : तालुक्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग असणाऱ्या जामगाव, लासूर स्टेशन आणि डोणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुका यंदा अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. गंगापूरला या तिन्ही गावांनी आमदार दिला असून पंचायत समिती, खरेदी-विक्री संघ, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांवर या गावाचे वर्चस्व दिसून येते. जामगाव ग्रामपंचायतीमध्ये माने विरोधात इतर असा सामना रंगणार आहे. यात माजी आमदार, गंगापूर साखर कारखान्याचे माजी चेअरमन यांचा एक गट तर दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार बंब यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असा एक गट सक्रिय आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जामगाव ग्रामपंचायत माने गटाकडे होती. त्यामुळे यंदा त्यांना शह देण्यासाठी गावातील तरुण एकवटले असल्याचे चित्र आहेत. जामगावचे माजी आमदार अण्णासाहेब माने आणि कारखान्याचे माजी चेअरमन कुंडलिकराव माने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्याने त्यांच्यात वितुष्ट आले होते; मात्र आता दोघांनी सरपंचपदाची दोरी आपल्या हाती रहावी म्हणून राजकीय वैर विसरून एकत्र आले. कुंडलिक माने यांनी सरपंच पदासाठी मुलास (प्रशांत) पुढे केले असून याच वाॅर्डातील विद्यमान सदस्य विनोद काळे त्यांच्या विरोधात असतील. या निवडणुकीसाठी लक्ष्मण सांगळे, माजी सरपंच बशीर पटेल, विनोद काळे यांनी एकत्र येत पॅनल उभा केल्याने माने यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले आहे.
गंगापूर सहकारी साखर कारखाना गेल्या दहा वर्षांपासून बंद असल्यामुळे कामगार वर्ग गाव सोडून गेल्याने या मतदारांना शोधण्याची उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तालुक्यात मोठी बाजारपेठ असलेल्या सावंगी (लासूर स्टेशन) ग्रामपंचायतमधून सरपंचपदासाठी रस्सीखेच होईल. सावंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आमदार प्रशांत बंब आणि पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड हे दोघे एकत्र पॅनल करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या विरोधात त्यांचे जुने सहकारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनेश मुथा, संजय जैस्वाल, भरत पाटणी हे वंचित बहुजन आघाडीच्या नवयुवकांना सोबत घेत त्यांना टक्कर देणार असल्याचे सध्या चित्र आहे. या निवडणुकीसाठी आमदार बंब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर, सभापती संभाजी पाटील डोणगावकर, काँग्रेसचे किरण पाटील डोणगावकर यांच्यासह अनेकांनी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीतील जय-पराजय संबंधित पुढाऱ्यासाठी प्रतिष्ठेचा विषय असणार असल्याने त्याकडे अनेकांचे लक्ष आहे.