औरंगाबाद : खासगी रुग्णालयांत प्रॅक्टिस करणाऱ्या घाटी रुग्णालय आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील डाॅक्टरांची ‘सीआयडी’मार्फत चौकशी केली जात असल्याचे शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. एस. पी. डांगे म्हणाले. त्यांच्या या धक्कादायक संवादाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
एका संघटनेतर्फे डाॅ. एस. पी. डांगे आणि घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. काशीनाथ चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी बोलतानाचा व्हिडिओसमोर आला आहे. खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांसंदर्भात शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे. आमचा रिपोर्ट पोलिसांना देतो. त्यानंतर सीआयडीकडून चौकशी होते, असे डाॅ. डांगे व्हिडिओत म्हणतात. व्हिडिओत डाॅ. डांगे यांनी खासगी रुग्णालयांवरही निशाणा साधला. खासगी रुग्णालयांचे एजंट घाटी, शासकीय दंत महाविद्यालयात रुग्णांच्या शोधार्थ फिरतात. अशा लोकांवर वाॅच ठेवला जात आहे. एका रुग्णालयाने रुग्णाच्या उपचारासाठी दहा लाख रुपये सांगितले. तो रुग्ण आपल्याकडे आला. घाटी म्हणजे मरण, असे नाही. नाममात्र दरात उपचार येथे होतात, असेही या डाॅ. डांगे म्हणतात.
------
विहित कार्यपद्धती
एनपीए घेऊनही खाजगीत प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांविषयी विहित कार्यपद्धतीनुसार पोलिसांना माहिती दिली जाते. अशा डाॅक्टरांची सीआयडीमार्फत चौकशी होते आणि रिपोर्ट मागविला जातो. त्यात तथ्य असेल तर शासनाला कळविले जाते. यापूर्वी शासकीय दंत महाविद्यालयातील काही डाॅक्टरांची नावे दिली होती.
- डाॅ. एस. पी. डांगे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय