वाळूज महानगर : सिडकोने सुविधा देणे बंधनकारक असतानाही सुविधा दिल्या जात नाहीत. उलट शासनाच्या धोरणाचा आधार घेवून आरक्षणाच्या जागा विकण्यात आल्या. सिडको प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळेच साऊथसिटीचा विकास खुंटला असून, नागरी सुविधांअभावी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सिडकोने वाळूज महानगर २ विकसित करताना विकासकाकडून २५ टक्के जमीन घेतली. जमिनीचे भूखंड पाडून विक्री करण्यात आली. भूखंड विक्री करताना सिडकोने या भागात शाळा, आरोग्य केंद्र, वाचनालय व अंगणवाडीसाठी भूखंड आरक्षित ठेवले होते. हे आरक्षण पाहून अनेकांनी या ठिकाणी घरे घेतली. मात्र, सिडकोने शासनाच्या धोरणाचा आधार घेवून आरक्षित भुखंडांची विक्री केली. आरक्षित जागेवर प्रत्यक्षात काहीच नसल्याने भूखंड खरेदी केलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला. शिवाय सिडकोकडून मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नाहीत.
पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्याची दुरावस्था झाली असून, अनेक भागात पक्के रस्ते नाहीत. उद्यान नावालाच असून येथे कोणत्याच सुविधा नाहीत. त्यामुळे बच्चे कंपनी व ज्येष्ठ नागरिकांचा हिरमोड होत आहे. अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. आरोग्य केंद्र, शाळा, वाचनालय, अंगणवाडी याची कोणतीही सोय नाही. प्रवेशद्वारा शेजारील उद्यानाचा आश्वासनानंतरही विकास केलेला नाही. येथील रहिवाशांना नागरी सुविधांसाठी कायम संघर्ष करावा लागत आहे. सिडको प्रशासनामुळेच या भागाचा विकास रखडला गेला असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.