वाळूज महानगर : सिडको प्रशासनाने वडगाव कोल्हाटी येथे महिनाभरापूर्वी ड्रेनेजलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, सदरील काम संथगतीने सुरू आहे. ड्रेनेजलाईनच्या कामाखाली मुख्य रस्ता खोदून ठेवल्यामुळे गावातील तसेच या मार्गाने ये-जा करणाऱ्या कामगारांची गैरसोय होत आहे.
सिडकोअंतर्गत येणाऱ्या द्वारकानगरी, दिशा कुंज, सारा विहार आदी नागरी वसाहतीचे ड्रेनेज व सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजलाईनची सोय नाही. या वसाहतीचे ड्रेनेज व सांडपाणी फुलेनगर व छत्रपती नगरमधील मोकळ्या भूखंडावर सोडून दिले जाते. नागरी वसाहतीलगतच घाण पाणी साचत असल्याने रहिवाशांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. सांडपाण्यामुळे फुलेनगर व छत्रपतीनगरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच येथील ड्रेनेजलाईनचे काम सिडको प्रशासनाने हाती घेतले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार कमानीपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर वाळूज औद्योगिक क्षेत्राकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर शिवाजी महाराज पुतळा ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. पण हे काम काही दिवसांपासून अतिशय संथगतीने केले जात आहे. ३-४ दिवसांच्या कामासाठी दोन-दोन आठवड्यांचा कालावधी लागत आहे. शिवाय कामासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नागरिक व वाहनधारकांची गैरसोयड्रेनेजलाईनचे पाईप टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून, मलबा रस्त्यावर टाकला आहे. शिवाय हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिवाजी चौक ते स्व. कल्याण साळे चौकापर्यंतचे काम होऊनही रस्त्यावरील मलबा तसाच आहे. शिवाय अण्णाभाऊ साठे चौक ते शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमान हा रस्ता एका बाजूने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. एकेरी वाहतूक सुरू असल्याने व या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने नागरिक व वाहनधारकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.