वाळूज महानगर : सिडकोतील एमआयजी व एलआयजी भागासह अनेक नागरी भागांना काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असून, विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
येथील एमआयजी भागातील देवगिरीनगर, जिजामातानगर, एलआजयी भागातील साईनगर तसेच राजर्षी शाहुनगर, पियुष विहार सोसायटी आदी नागरी वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे पाण्याची वेळ निश्चत नसल्याने गैरसोय होते.
याविषयी सांगूनही प्रशासनातर्फे लक्ष दिले जात नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. या विषयी सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी तो होऊ शकला नाही. सिडकोच्या मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यातून दररोज शेकडो लीटर पाणी वाया जाते. तरीही गळती दुरुस्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. प्रशासनाने गळती थांबविली तर रहिवाशांना योग्य दाबाने समान पाणी पुरवठा होऊ शकेल, असे रहिवाशांनी म्हटले आहे.