वाळूज महानगर : सहा दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने देवगिरीनगरातील संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी (दि.९) सिडको वाळूज कार्यालयावर धडक देवून पाणी देण्याची मागणी केली. यावेळी संतप्त महिलांनी सिडकोच्या अधिकाऱ्यासमोर विविध समस्यांचा पाढा वाचत प्रश्नांचा भडीमार केला.
सिडकोला एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्यात जवळपास १ एमएलडी पाणी कपात झाली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हे पाणी फारच कमी असल्याने सिडको वाळूज महानगरातील अनेक नागरी वसाहतींत पाणीटंचाई सुरु आहे. काही भागात चार ते पाच दिवसांआड तर काही भागांत आठवड्यातून एकदा तेही कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पैसे देवूनही वेळेवर टँकर मिळत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. एमआयजी भागातील देवगिरी नगरात सहा दिवसांपासून निर्जळी आहे. शिवाय हातपंपही नादुरस्त आहेत.
संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी सिडको वाळूज कार्यालयावर धडक दिली. अधिकाºयाला घेराव घालत पाणी पुरविण्याची मागणी केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य अमित चोरडिया, अशोक दोमाटे, नागेश कुकलारे, ज्योती दोमाटे, छाया कुकलारे, प्रिया देशमुख, सुनिता झुंझार, लता पोफळे, रोहिणी गोसावी, जयश्री आमले, संगीता दिवाण, सुनंदा चौधरी, सरला तांबे, मंदाकिनी देसले, सुनिता दानकर, लता पोपडे, रोहिणी उबेधाड, रेणुका कनप्पा, मंदा काकडे, छाया राऊत, अलका वांजरेकर, शलाका खंदारे, गवळण विधमवार, सुरेखा हिवाळे आदी महिलांची उपस्थिती होती.