औरंगाबाद : हर्सूल तलावातील अतिरिक्त ५ एमएलडी पाणी हर्सूल गावासह आसपासच्या परिसराला देण्यात येत आहे. त्यामुळे एन-७ पाण्याच्या टाकीवरून देण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. हे पाणी सिडको-हडकोसाठीच वापरण्यात येत आहे. सिडको-हडकोत पूर्वीच्या तुलनेत पाण्याच्या तक्रारी अत्यंत कमी झाल्याचा दावा मनपा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने हर्सूल तलावातील पाणी घेण्याकरिता स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करून त्याची क्षमता वाढविण्यात आली. हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र ते हर्सूल जेलपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात येऊन अडीच लाख लीटर पाणी जलकुंभात घेण्यात आले. त्यासोबतच हरसिद्धीमाता जलकुंभातदेखील हर्सूल तलावाचे पाणी घेऊन विविध वसाहतींना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तीन दिवस पाणीपुरवठा करताच काही नागरिकांनी तक्रारी केल्या. हर्सूलचे पाणी नागरिकांना मिळत असले तरी ते अत्यंत गढूळ असल्यामुळे नागरिकांनी हे पाणी पिण्यास नकार देत जायकवाडीचे पाणी मिळावे, अशी मागणी केली.
हडको -सिडको भागाला पाणीपुरवठा करताना हर्सूल आणि परिसराला देखील जायकवाडीतून मिळणारे पाच एमएलडी पाणी द्यावे लागत होते. सिडको एन-५, एन-७ च्या जलकुंभावरून जेलचा जलकुंभ आणि हरसिद्धीमाता जलकुंभ हे दोन्ही भरून घेतले जात होते. त्यामुळे सिडको-हडकोला सुरळीत पाणी पुरवठा करताना दमछाक होत होती. हर्सूलचा पाणीपुरवठा स्वतंत्रपणे सुरू झाल्यामुळे सिडको-हडकोचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.