विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एन-६ येथील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कब्रस्तानालगत असलेल्या सेंट्रल नाक्याला पालिकेच्या घनकचरा विभागाने कचरानाका करून टाकले आहे. कचऱ्याच्या ढिगांवर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यामुळे पावसाने कुजलेल्या कच-याची दुर्गंधी सिडकोवासीयांना नरकयातना देत आहे. मनपा, राजकीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे सिडकोतील नागरिक ‘कचरानाक्या’च्या विरोधात जनआंदोलनाच्या तयारीत आहेत.१२२ दिवसांपासून शहरातील कच-याच्या प्रक्रियेसाठी काहीही निर्णय झालेला नाही. २१ फेबु्रवारी रोजी मनपाने नारेगाव, मांडकी परिसरातील आंदोलकांना १५० दिवसांत कच-यावर तोडगा काढण्याचा शब्द दिला होता. १२२ दिवस संपले आहेत, अजून पालिकेला काहीही करता आलेले नाही. त्यामुळे नारेगावच्या आंदोलकांनी मनपावर जो अविश्वास दाखविला होता, तो खरा होता की काय, असे वाटू लागले आहे.पावसामुळे शहरातील कच-याचे ढीग कुजू लागले आहेत. १२२ दिवसांत मनपाने वाटेल तेथे डम्पिंग ग्राऊंड केले आहे. त्यामुळे त्या कच-यातून आता चोहोबाजूने दुर्गंधी सुटली आहे. जोरदार पाऊस झाला तर शहरातील प्रत्येक कानाकोप-यातून पुरलेला व साचलेला कचरा रोगराईयुक्त हवा निर्माण करील. ज्यामुळे मोठी समस्या शहराला भेडसावील. महिला व बाल आरोग्य कच-याच्या दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे. दिवसभर सिडकोतील एन-१, बजरंग चौकापर्यंत तर इकडे आझाद चौकापर्यंत कच-याची दुर्गंधी पसरते आहे. भर लोकवस्तीमध्ये कचरा डेपो असला तरी त्यावर प्रक्रिया करण्याची तसदी पालिका घेत नसल्यामुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे.
सिडकोवासीयांना नरकयातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:06 AM