लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडकोने शहरातील निवासी भूखंड विक्रीला काढले असून, त्याचे दर गगनाकडे घेऊन जाणार असल्याने सर्वसामान्यांना ते भूखंड परवडण्याजोगे नाहीत हे दरांवरूनच लक्षात येते. सिडकोच्या या अतिव्यावसायिक धोरणामुळे स्वस्तातील घरकुल, प्लॉट विक्री संकल्पना मोडीत निघाली आहे. हे महागडे प्लॉट धनदांडग्याशिवाय कुणालाही परवडणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील १५ परिसरातील निवासी भूखंड ६० वर्षांच्या करारावर सिडको प्रशासनाने विक्रीस काढले आहेत. ६५ भूखंड असून, प्रति चौ. मी. दराने ते विक्री केले जाणार आहेत. १८ हजार १९८ रुपये ते ६४ हजार ९८ रुपये प्रतिचौरस मीटर दर सिडको निवासी भूखंडास्ाांठी ठरविलेला आहे. म्हणजेच १ हजार ८१९ रुपये ते ६ हजार ४०० रुपये प्रतिस्क्वेअर फूट असा तो दर आहे. एवढी महाग जागा सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेली नाही. नोटाबंदीनंतर सिडकोने व्यावसायिक भूखंड विक्रीला काढले; परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वर्षभरानंतर निवासी भूखंड विक्रीसाठी मुहूर्त लागला असून, त्याचे दरही परवडण्याजोगे नसल्यामुळे यावेळी ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष आहे.
सिडकोच्या निवासी भूखंडांचे दर गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:20 AM