वाळूज महानगर : सिडको प्रशासनाच्या वतीने वाळूज महानगर-३ विकसित करण्यासाठी जवळपास २ हजार ६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाविषयी सिडकोच्या वतीने शेतकऱ्यांची बैठक आयोजित करून भूसंपादन व मावेजाविषयी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.सिडकोने वाळूज महानगर-३ विकसित करण्यासाठी वाळूज खुर्द, वाळूज बुद्रुक व रामराई या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी सिडकोच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी व मार्किंग करून शेतकऱ्यांना नकाशे देण्यात आले होते. पण भूसंपादन व मावेजाविषयी सिडकोकडून ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण होते. सोमवारी सिडकोच्या वाळूज कार्यालयात या तिन्ही गावांतील शेतकरी व सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर, प्रशासक एच. व्ही. आरगुंडे, मुख्य नियोजनकार रमेश डेंगळे, सहयोगी नियोजनकार एन. व्ही. गोलखंडे, अधीक्षक अभियंता एन. सी. बायस, भूमूल्यांकन अधिकारी विद्या मुंडे, भूमापन अधिकारी सुवर्णा पवार, वरिष्ठ नियोजनकार उईके आदींची उपस्थिती होती. सुनील केंद्रेकर म्हणाले की, भूसंपादन करताना शेतकऱ्यांना वाढीव रेडीरेकनरनुसार मावेजा दिला जाणार आहे. बैठकीत शिवप्रसाद अग्रवाल, संतोष धुमाळ आदींनी विविध मुद्दे उपस्थित केले. केंद्रेकर यांनी त्यांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे शेतकऱ्यांनी भूसंपादनास सहमती दर्शविली आहे. बैठकीला ज्ञानेश्वर देसाई, इस्माईल पठाण, डॉ.अनिल गंगवाल, काशीनाथ आरगडे, सलीम बेग, दत्तू राऊत, खलील पठाण, कल्याण अरगडे, विकास चौधरी, दिगंबर राऊत, सुधाकर वाघचौरे, भागवत जाधव, अशोक राऊत आदी उपस्थित होते.
सिडको खर्च करणार २६०० कोटी रुपये
By admin | Published: June 21, 2016 1:00 AM