वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सिडको प्रशासनाने सोमवारपासून राबविण्यास सुरुवात केली. गट नंबर ४९ मधील ३५ अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले. या कारवाईमुळे भुखंडांनी मोकळा श्वास घेतला आहे.
सिडको वाळूज महानगरात सिडकोच्या मोकळ्या भूखंडासह निवासी क्षेत्रात तसेच सर्व्हिस रोड व हरित पट्ट्यात अतिक्रमण केले आहे. औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब, पंढरपुरातील तिरंगा चौक, जयभीम चौक, शिवाजी चौक आदी ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे.
प्रशासनाने अनेकवेळा संबंधितांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या. परंतू याकडे अतिक्रमणधारक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. लोकांचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून प्रशासनाने संबंधितांना मुदतही दिली होती. मात्र तरीही अतिक्रमण काढले गेले नाही. प्रशासनाने सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून मोकळ्या जागेवरील अतिक्रमण निष्कासित केले. या करवाईमुळे भुखंडांनी मोकळा श्वास घेतला आहे.
गटनंबर ४९ मध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता कारवाईला सुरुवात करण्यात आली. प्रशासनाने ३५ कच्चे अतिक्रमण हटवून परिसर मोकळा केला. सोमवारी सिडकोच्या गट नंबर ४८ वरील मोकळा भूखंड, तसेच गट नंबर ४६ व ४७ मधील नाल्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाची मार्किंग करुन खुणा करण्यात आल्या आहेत.