वाळूज महानगर : सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. सिडको प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन रविवारी जलवाहिनीची दुरुस्ती करून होणारी पाण्याची नासाडी थांबविली.
सिडकोच्या अंतर्गत जलवाहिनीला अनेक दिवसांपासून गळती लागलेली होती. सूर्यवंशीनगरातील जिजामाता चौकालगत जलवाहिनीचा वॉल्व्ह नादुरुस्त झाला. रस्त्यावर पाणी साचत असल्याने या ठिकाणी प्रशासनाने खड्डा खोदला आहे. गळतीमुळे पाणी खड्ड्यात साचून रस्त्याने वाहते. साचलेल्या पाण्यात मोकाट कुत्रे व डुकरे बसत असून, हेच पाणी पुन्हा जलवाहिनीत मिसळत होते. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांनी सिडको प्रशासनाकडे तक्रार करून दुरुस्तीची मागणी केली होती; पण प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते.
लोकमतने ६ जानेवारीच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने जागे झालेल्या सिडको प्रशासनाने तात्काळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. सूर्यवंशीनगर परिसरात गळती असलेल्या जलवाहिनीची रविवारी दुपारी दुुरुस्ती करण्यात आली. प्रशासनाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम लवकर हाती घेऊन पाणी गळती थांबविल्याने या भागातील रहिवाशांनी लोकमतचे आभार मानले आहेत.