वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात ड्रेनेजलाईनची सोय नाही. ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरी वसाहतीत ड्रेनेजचे चेंबर सारखे चोकअप होत आहे. घाणपाणी घरासमोर साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिडको वाळूज महानगरात ड्रेनेज व सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजलाईनची व्यवस्था केलेली नाही. नागरी वसाहतीतील ड्रेनेज व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांनी शोषखड्डे तयार केले आहेत. सिडकोने दोन दशकांपूर्वी लोकसंख्येच्या प्रमाणात अंतर्गत ड्रेनेजलाईन टाकली आहे. मात्र आजघडीला लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ड्रेनेज व सांडपाण्याचा जुन्या ड्रेनेजलाईनमधून निचरा होत नाही. त्यामुळे येथील देवगिरीनगर, साक्षीनगरी, साईनगर आदी भागात ड्रेनेजचे चेंबर सारखे चोकअप होत आहे.
याविषयी वारंवार सांगूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व डासाचा त्रास सहन करावा लागत आहे. उग्र वासामुळे मळमळ, डोकेदुखी आदी आरोग्यविषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दररोजच्या या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.